देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाले असून, संपूर्ण देशात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. केंद्र सरकार ‘आझादी का अमृत महोत्सव’ वर्षभर साजरा करणार आहे, त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. ठाकरे सरकारने देखील राज्यात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली असून, याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. स्वातंत्र्यामध्ये भाग घेणाऱ्या राज्यातील ‘त्या’ स्वातंत्र्य सेनानींच्या वारसांना सरकारी नोकरीत सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
सामान्य प्रशासन विभागाचा प्रस्ताव तयार!
स्वातंत्र्य सेनानींच्या वारसांना सरकारी नोकरीत समाविष्ट करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने हालचाली सुरु केल्या असून, गुणवत्तेनुसार त्यांना सरकारी नोकरी देण्यासंदर्भातील प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजूरीसाठी दिला दिल्याची माहिती एक अधिकाऱ्याने दिली. स्वातंत्र्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सेनानींच्या वारसांना सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, असा निर्णय १९९१ मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर २००५ मध्ये नवी शासन अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र त्यामध्ये कोणतीच स्पष्टता नव्हती. आता अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा एकदा हालचाली सुरु झाल्या असून, लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य सेनानींच्या वारसांची भरती प्रक्रिया ही एकाच वेळी होणार असून, सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘हिंदुस्थान पोस्ट’शी खासगीत बोलताना सांगितले की, विविध विभागात सध्या पदे रिक्त असून, शैक्षणिक पात्रता बघून त्या त्या विभागात नियुक्त केली जाणार असल्याचे सांगितले.
(हेही वाचा : चिपी विमानतळासाठी सापडला वर्षभरातील ‘चौथा’ मुहूर्त!)
स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींचा असाही होणार सत्कार!
एकीकडे राज्य सरकार स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याचा विचार करत असताना स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींचा देखील सत्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या स्वातंत्र्य सेनानींना शाल, श्रीफळ आणि ५ हजार रुपये देऊन सन्मानित करणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संबंधीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. राज्यभरातील ७ हजार ९०० स्वातंत्र्य सेनानींना सन्मानीत करण्यात येणार असून, यासाठी जवळपास ५ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाचे संकट असल्याने जिल्हास्तरावर प्रांताधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांच्या माध्यमातून या सेनानींचा सत्कार केला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community