कोविडमध्ये मुलुंड आणि दहिसरमधील जंबो कोविड सेंटर उभारुन दिल्याबद्दल एमएमआरडीएचे कौतूक होत असले, तरी त्यांनी निश्चित केलेली भाड्याची रक्कम आजही महापालिकेला अदा करावी लागत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या कोविड सेंटरसाठी एक महिन्याचे भाडे हे केवळ ७ कोटींचे आहे. त्यामुळे एका खाटेकरता दरदिवशीचा खर्च हजार ते बाराशे रुपयांच्या घरात गेलेला असून एमएमआरडीएने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता जे भाड्याचे पैसे कंत्राटदाराला देऊ केले, त्याच रकमेत आता महापालिकेला भाडे द्यावे लागत आहे. परिणामी महापालिकेवरील कोविड खर्चाचा भार वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जंबो कोविड सेंटर करता २२ कोटींची मंजुरी
कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार दहिसर जकात नाका येथे ९५५ खाटांचे, तर कांदरपाडा येथे ११० खाटांचे आयसीयू तथा एचडीयू रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही ठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारल्यानंतर जुलै २०२० रोजी मुंबई मेट्रोने महापालिकेला हस्तांतरीत केली. या उभारण्यात आलेल्या रुग्णालयात सेवा सुविधा पुरवण्यासाठी कंत्राटदार आदींचे ३ महिन्यांचे भाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेडने अदा केले होते. त्यानुसार त्यांना दहिसरमधील या दोन्ही सेंटरकरता विविध सेवा पुरवण्यासाठी मासिक ३ कोटी ७२ लाख ०७ हजार ६७० रुपये एवढी रक्कम निश्चित करण्यात आली होती. हा कालावधी ६ ऑक्टोबर २०२० रोजी संपुष्टात आल्यानंतर पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजे ६ जानेवारी २०२१ पर्यंत मुलुंड व दहिसर जंबो कोविड सेंटर करता एकूण २२ कोटी ४१ लाख १९ हजार ४१८ रुपयांची मंजुरी दिली.
(हेही वाचा भूमिगत कचरा पेट्यांचे वाजले बारा!)
तर आर्थिक बोजा कमी झाला असता
त्यातील दहिसर कोविड सेंटरसाठी तीन महिन्यांसाठी १० कोटी ४० लाख ६५ हजार ३६८ रुपये एवढे भाडे असून उर्वरीत भाडे हे मुलुंड येथील कोविड सेंटरचे होते. दहिसर जकात नाका येथे ९५५ खाटांचे क्वारंटाईन सेंटर आणि ११० खाटांचे कांदरपाडा येथील आयसीयू व एचडीयू आदी एकूण १०६५ खाटांकरता मासिक भाडे ३ कोटी ४६ लाख ८८ हजार ४३२ रुपये एवढे आहे. त्यात प्रत्येक खाटांसाठी मासिक भाडे हे ३२ हजार ५७१ एवढे असून प्रति दिन प्रति खाटेचे भाडे हे १ हजार ८५ रुपये एवढे असल्याची माहिती दहिसरच्या जंबो कोविड सेंटरच्या अधिष्ठात्यांनी दिली आहे. मुंबई मेट्रो रेल्वेकडून हस्तांतरीत करून घेतल्यानंतर महापालिकेने आपल्या दरानुसार भाडे आकारले असते तर ती रक्कम कमी झाली असती. परंतु मेट्रोनेचे आकारले भाडे कायम ठेवल्याने महापालिकेवरील भार वाढल्याचे पहायला मिळत आहे.
कोविडच्या काळात पैशाची उधळपट्टी
भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी ११ कोटी रुपयांचे भाडे केवळ तंबू बांधण्यासाठी आकारण्यात आले आहे. जर तीन महिन्यांचा हिशोब केला, तर दिवसाला १० लाख रुपये आणि हजार रुपये प्रत्येक रुग्णाच्या मागे आकारण्यात आले आहे. त्यामुळे हे तंबू कशा प्रकारचे होते याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी करतानाच शिंदे यांनी कोविडच्या काळात पैशाची उधळपट्टी झाली आहे, याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. जागा महापालिकेच्या ताब्यातील आहे, तरीही एवढे भाडे कसे, असा सवाल करत याची माहिती सादर करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती.
Join Our WhatsApp Community