राज कुंद्राची अटक वाझेमुळे टळलेली का? 

यश ठाकूर याने एप्रिल महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मेलद्वारे तक्रार केली. यात त्याने अटक टाळण्यासाठी पोलिसांकडून पैशाची मागणी झाल्याचे म्हटले.

पॉर्न व्हिडिओ तयार करण्याचे प्रकरण फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आल्यानंतर या गुन्ह्याचा तपास थांबला होता, तसेच गुन्हे शाखेतील अनेक अधिकाऱ्याच्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल्या झाल्या होत्या, या बदल्यामध्ये या गुन्ह्याचे तपास अधिकारी यांचा देखील समावेश होता. फेब्रवारी महिन्यात सचिन वाझे हा देखील गुन्हे शाखेत कार्यरत व सक्रिय होता. बड्या गुन्ह्यातील व्यवहार वाझेच पहात होता, असे बोलले जात आहे. तसेच राज कुंद्रा याला या प्रकणात उशिरा झालेली अटक ही वाझे प्रकणामुळे टळली होती, असेही सांगण्यात येत आहे.

कुंद्राने २५ लाखाची लाच दिली?

पॉर्न व्हिडिओ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्रा याने अटक टाळण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना २५ लाख रुपयांची लाच खरोखर दिली होते का, याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही. मात्र हा गंभीर आरोप मुंबई पोलिसांवर लावण्यात आल्यामुळे मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा गंभीर आरोप या गुन्ह्यातील फरार असणाऱ्या एका आरोपीने केला आहे. त्याने या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंध विभागाला ई – मेल पाठवला होता, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. जर खरोखर या गुन्ह्यात आर्थिक व्यवहार झाला असेल तर ही रक्कम कुणाच्या खात्यात गेली हे सांगण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आलेले नाही.

(हेही वाचा : मशिदींवरील भोंग्यांविरूद्ध सिनेमागृहात घुमणार ‘आवाज ‘!)

यश ठाकूरने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केलेली तक्रार 

पॉर्न व्हिडिओ तयार केल्या प्रकणात मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने नुकतीच राज कुंद्रा याला अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रॉपर्टी सेलने मलावणी मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून पॉर्न व्हिडिओ तयार करण्याचा धंदा उघडकीस आणला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून ९ जणांना अटक करण्यात आली होती, त्यात अभिनेत्री गेहना वशिष्ट हीचा देखील समावेश होता. तर या गुन्ह्यात राज कुंद्रा आणि यश ठाकूर याचे नाव समोर आले आले होते. यश ठाकूर याने एप्रिल महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एक मेल टाकून तक्रार केली होती. या तक्रारीत त्याने आपल्याकडे एक व्यक्ती आला होता, त्याने या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी राज कुंद्राने २५ लाख रुपये दिले असून तुम्ही देखील पैसे द्या, तुमची देखील अटक टळेल, अशी मागणी केल्याचे म्हटले आहे. एसीबीने ठाकूरचा मेल मुंबई पोलिस आयुक्तलयाला फॉरवर्ड केल्याचे समजते. राज कुंद्रा याला अटक होताच पुन्हा यश ठाकूर याचे नाव पुढे आलेले आहे. त्यानंतर हे ई मेल प्रकरण चर्चेत आले असून याबाबत मुंबई पोलिसांकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचे समजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here