२० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सीमावर्तीयांना वाऱ्यावर सोडले होते, असा गंभीर आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव तथा ‘माय होम इंडिया’ संस्थेचे संस्थापक सुनिल देवधर यांनी केला. चीनच्या आक्रमणावेळी नेहरू दिल्लीत बसून ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ म्हणत कबुतरे उडवत होते, असेही ते म्हणाले.
( हेही वाचा : हा १९६२चा नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भारत आहे; अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा चीनला गर्भित इशारा )
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘माय होम इंडिया’ संस्थेतर्फे आयोजित केलेल्या ‘वन इंडिया’ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, पुरस्कारार्थी तेचि गुबीन, भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर, पद्मश्री अनुराधा पौडवाल, डॉ. हरिश शेट्टी, रमेश पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते. देवधर पुढे म्हणाले, २० ऑक्टोबर १९६२ ला चीनने भारतावर आक्रमण केले, तिरंगा झेंडा काढून त्याजागी ड्रॅगन लावला. त्यांचे सैनिक आसामच्या तेजपूरमध्ये दिसल्यानंतर तेथील लोकांनी फोन करून पंडित जवाहरलाल नेहरुंकडे मदत मागितली. पण नेहरूंनी रेडिओवरून भाषण करण्यापलीकडे कोणतीही भूमिका घेतली नाही. आसामच्या जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडले.
त्यावेळचे संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांचे विचार तर अतिभयंकर होते. आपण कोणावर आक्रमण करणार नसू, तर आपल्यावर कोण कशाला आक्रमण करेल, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे आपल्याला शस्त्रास्त्रांची गरज नाही, असे म्हणत त्यांनी शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात (ऑर्डिनन्स फॅक्टरी) कॉफी निर्मिती यंत्रे बनवण्यास सुरुवात केली, असा आरोपही देवधर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर चित्र बदलले आहे. शत्रूच्या डोळ्यांत डोळे घालून सामोरे जाण्याची धमक त्यांनी दाखवली. मोदींनी उत्तर पूर्वेकडील राज्यांकडे समस्या म्हणून नव्हे, तर बदल घडवण्याची संधी म्हणून पाहिले. याआधी अरुणाचल प्रदेश रेल्वेच्या नकाशात नव्हता. पण मोदी सरकारच्या काळात तिथे रेल्वेचे जाळे उभे राहिले, असेही त्यांनी सांगितले.
तेचि गोविंद वन इंडिया पुरस्काराने सन्मानित
अरुणाचल प्रदेशसह संपूर्ण उत्तर पूर्वेत धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी कार्यकरणाऱ्या तेचि गोविंद यांना यंदाच्या वन इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ७०च्या दशकात उत्तर पूर्व राज्यांत धर्मांतरणाची प्रकरणे वाढू लागल्यानंतर आम्ही आम्ही इंडिजिनियस फाउंडेशनची स्थापना केली आणि व्यापक लढा उभारला. २००१ मध्ये आम्ही श्रद्धा जागरण संघ स्थापन केला. त्यामुळे धर्माबाबत स्थानिकांमध्ये आस्था जागृत होण्यास मदत झाली आहे. १९९६ पासून आतापर्यंत संपूर्ण अरुणाचल प्रदेशात ६०० हून अधिक श्रद्धा जागृत केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या माध्यमातून अनेक जण पुन्हा स्वधर्मात परतू लागले आहेत. भारतीय संस्कृतीचे रक्षण करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community