कोरोनाकाळात मालाडमध्ये ‘सीआरझेड’ क्षेत्रात नियमोल्लंघन करून स्टुडिओ उभारण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून, स्टुडिओचे भाडे कोणाच्या खिशात गेले, याला कोणाचा आशीर्वाद आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित करीत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले.
( हेही वाचा : मुख्यमंत्री बोलतात की धमकी देतात? – एकनाथ खडसेंचा हल्लाबोल )
विधानसभेत उपस्थित लक्षवेधीवर ते बोलत होते. भातखळकर म्हणाले, मालाड पश्चिमेला मढ भागात एरंगळमध्ये ‘एमटीडीसी’ची म्हणजेच राज्य सरकारची मोठी जागा आहे. ती सीआरझेड क्षेत्रात मोडते. त्यालाच लागून जिल्हाधिकारी कार्यालयाची काही जमीन आहे. मविआ सरकारच्या काळात ‘एमटीडीसी’च्या जागेवर भरणी करण्याकरता अर्ज केले गेले. त्यानंतर या अर्जांना परवानगीही देण्यात आली. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून ही परवानगी दिल्याचा आरोप भातखळकरांनी केला.
मुंबई शहर आणि उपनगराच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी त्यावेळेस या जागेला भेट दिली होती. पुढे भरणीच्या कामाला वेग आला. परवानगी देताना अशी अट होती की, एक एकरावर एक हजार झाडे लावायची. पण आज त्या ठिकाणी एकही झाड नाही. याउलट मूळ जागेवर जी झाडे होती ती नष्ट केली गेली. कांदळवन क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी तिथे झाडे असल्याची नोंद केली होती. असे असतानाही भरणी करण्यासाठी परवानगी का देण्यात आली, सर्व अटी का पाळल्या गेल्या नाहीत, याची चौकशी करण्याची मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
गोव्यातील नियमांचा घेतला आधार
‘एमटीडीसी’च्या जागेला लागून जिल्हाधिकारी कार्यालयाची जागा आहे. कोरोनाकाळात चित्रीकरण बंद असताना या जागेवर तात्पुरते बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली. सीआरझेड क्षेत्राचे जे पत्रक फक्त गोव्यासाठी लागू आहे, त्याचा आधार घेऊन सहा महिन्यांसाठी ही परवानगी देण्यात आली. पण, आता दीड-दोन वर्षे झाली तरी तात्पुरते बांधकाम हटविले नाही. हे तात्पुरते बांधकाम ५५ फुटांचे असून, तेथे १५ ते २५ स्टुडिओ उभारण्यात आले आहेत, अशी माहिती भातखळकर यांनी सभागृहात दिली.
…तेव्हा पर्यावरण रक्षणाची भजने गायली
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना सत्ताधारी सतत सकाळ-संध्याकाळ पर्यावरणाच्या नावाने भजने गात होते. पर्यावरणाच्या मुद्द्याला धरून त्यांनी मुंबईतल्या मेट्रोची वाट लावली. मात्र, सीआरझेड क्षेत्रातील जागेत भराव टाकून पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप भातखळकर यांनी केला.
Join Our WhatsApp Community