राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील पायाभूत सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. धारावी पुनर्वसन प्रकल्प तसेच राज्यातील इतर प्रकल्पांवरही मोदींशी चर्चा केली.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, वडील, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी व मुलगाही हजर होते. या भेटीत मोदींसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ विकासकामांवर चर्चा झाली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या पावसाबाबतही मोदींनी जाणून घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, रायगड येथील इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेबद्दलही मोदींनी सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच, पावसाळ्यात होणाऱ्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, या दुर्घटनाग्रस्तांचे राज्य शासनाकडून पुनर्वसन केले जाईल. तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यात राज्य सरकार कोणतीही हयगय बाळगणार नाही. तसेच, अशा घटना होऊ नये, यासाठी उपाययोजना राबवण्याबाबतही विशेष लक्ष दिले जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल झाले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा नियोजित दौरा न्हवता . तसेच, मुख्यमंत्री कार्यालयातूनही मुख्यमंत्री अचानक दिल्लीला का गेले? हे सांगण्यात आलेलेल नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या तातडीच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना ऊत आला आहे. पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. परंतु या भेटीगाठीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून मुख्यमंत्री शिंदे वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोजगार मेळाव्यात ७० हजारांहून अधिक तरुणांना दिले जॉइनिंग लेटर)
पावसाळी अधिवेशनापूर्वी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार निश्चित होणार, असे सांगितले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह मंत्रिमंडळात सहभागी झाल्याने शिंदे गटाची चांगलीच गोची झाली आहे. कोणत्या गटाला कोणते मंत्रीपद द्यायचे, यावरून शिंदे गट व अजितदादा गटात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. शिंदे सरकारमध्ये अनपेक्षितपणे सामील झालेल्या अजित पवार गटामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. सत्तेत सहभागी होताच राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपददेखील मिळाले आहे. त्यामुळे वर्षभरापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटाचला कधी स्थान मिळेल याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community