मनसे म्हणतेय, ‘तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो’ म्हणण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही, विचारले ८ प्रश्न

126

दसरा मेळावा उद्यावर आलेला असताना शिवसेना आणि शिंदे गटाच्या होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने इतिहासात पहिल्यांदाच सेनेचे दोन दसरा मेळावा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या या पत्रात मनसेने त्यांना आठ प्रश्न विचारले आहेत. याबाबत कात्रजगाव पुणे येथील मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी ट्वीट केले आहे. या पत्रात असे लिहिले आहे की, उद्धवजी… उद्या शिवतीर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तर द्या.

मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी ट्वीट करत असे म्हटले की, उद्धवजी…. तुम्हाला ‘हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरला नाही, अशी टीकाही मनसेकडून करण्यात आली. तसेच यावेळी उद्धव ठाकरेंना मनसेने खालील ८ प्रश्न विचारले आहे.

(हेही वाचा – अलर्ट! पुण्यातील ‘या’ भागातील पाणी पुरवठा ६ ऑक्टोबरला राहणार बंद)

हे आहेत ते ८ प्रश्न

१. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षांशी युती का केली?

२. PFI सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात?

३. एमआयएम सपा सारख्या पक्षांसोबत दोन चार मतांसाठी हातमिळवणी का केली?

४. सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण का रोखलं नाही?

५. मशिदीवरील भोगं उतरले पाहिजेत हा बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले?

६. बाळासाहेबांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात?

७. अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केली?

८. आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हे कसं सुचलं?

साहजिकच या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार… त्यामुळे माझ्या जमलेल्या तमाम “हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही, असे म्हणत या पत्राचा मनसेने समारोप केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.