बाळासाहेबांनंतर दसरा मेळाव्यातील ‘या’ पाच घटना ज्याने शिवसेनेत निर्माण झाली अस्वस्थता

167

शिवसेना आणि शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा हे समीकरण बनले आहे. मागील ५६ वर्षांची ही परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत २०१२ पर्यंत एकच पक्ष एकच नेता, एकच दिवस आणि एकच मैदान अशी दसरा मेळाव्याच्या संबंधी म्हण तयार झाली होती. २०१२ साली शिवसेना प्रमुखांचे निधन झाले आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षापासून मेळाव्यात जणू काही अघटीत घटना घडण्याचे सत्र सुरू झाले.

मेळाव्यासाठी कोर्टाच्या वाऱ्या सुरू झाल्या

कधी नव्हे ते दसऱ्या मेळाव्याचा ‘आवाज’ ध्वनी प्रदुषण करत आहे, अशी तक्रार झाली. स्वयंसेवी संस्था यासाठी २०१३मध्ये मुंबई उच्च न्यायालयात गेल्या आणि पहिल्यांदा शिवसेनेला या मेळाव्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागली. न्यायालयात विनंती करून अखेर परवानगी मिळाली पण आवाज कमी करा अशी बतावणी सहन करावी लागली. तेव्हापासून शिवसेनेला या मेळाव्यासाठी दर वर्षी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले. २०१४ साली आचारसंहितेमुळे मेळावा झाला नाही. पण २०१५ ला पुन्हा न्यायालयात जावे लागले. शेवटी २०१६ मध्ये युती सरकार असल्याने शिवसेनेने सरकारी निर्णय काढून मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कायमचे खुले केले.

मनोहर जोशींचा अपमान झाला

२०१३ सालचा दसरा मेळावा हा पहिला मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय झाला. तेव्हापासून शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे बनले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली होती, त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळातील सदस्य मनोहर जोशी यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय झाल्याने जोशी यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचे पडसाद दसरा मेळाव्यात उमटले, मेळाव्यासाठी जोशी आले, पण व्यासपीठाच्या खालून शिवसैनिकांनी मनोहर जोशींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे नाराज जोशी व्यासपीठावरून खाली उतरून सरळ घरी गेले. विशेष म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही.

उद्धव मुख्यमंत्री बनले पण कोरोनाने रोखले

बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात कधीच निवडणूक लढवली नाही की सत्तेची पदे भोगली नाही, बाळासाहेबांच्या हयातीत ही उद्धव ठाकरे यांनी याचे धाडस केले नाही, पण बाळासाहेबांच्या निधनानंतर ठाकरे घराण्याच्या या परंपरेला छेद देत आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढवली, निकाल लागताच उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली, त्यात स्वतः मुख्यमंत्री बनले, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांना शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यात तमाम शिवसैनिकांना संबोधित करण्याचे भाग्य लाभले नाही. २०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांत कोरोनामुळे शिवाजी पार्क येथे मेळावा झाला नाही.

रामदास कदम मेळाव्यात गैरहजर राहिले

२०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना रसद पुरवल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर झाला. कदमांनी हा आरोप फेटाळत उद्धव ठाकरे यांना लेखी खुलासा केला. पण तोवर शिवसेनेत कदमांच्या विरोधात वातावरण झाले होते, कारण अनिल परब उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती बनले होते. २०२१ मध्ये कोरोनामुळे जरी मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या बंदिस्त सभागृहात घ्यावा लागला तरी, त्या मेळाव्यात मनोहर जोशी यांच्यासारखी पुनरावृत्ती होवू नये म्हणून कदमांनी मेळाव्याला न जाण्याचा निर्णय घेतला. मेळाव्यात पहिल्यांदा कदमांनी गैरहजेरी लावली

२०२२ ला शिवसेना फुटली अन् मेळावा पुन्हा कोर्टात अडकला

२०१९ ला उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडून दोन्ही काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं, मात्र यामुळे जनतेची फसवणूक केली, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडून भाजपाच्या सोबत सत्ता स्थापन केली, शिंदे यांनी नुसताच शिवसेनेवर दावा केला नाही तर ऑक्टोबर २०२२मध्ये होणारा दसरा मेळावा आमचाच होईल अशी घोषणा केली. ज्यामुळे उद्धव गटावर पुन्हा दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले. कारण महापालिकेने उद्धव गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्यास परवानगी नाकारली, अखेर न्यायालयात बराच युक्तिवाद केल्यावर न्यायालयाने उद्धव गटाला परवानगी दिली, तरीही शिंदे गट न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा तयारीत आहे, तसे झाल्यास उद्धव गटाच्या दसरा मेळाव्याचे भवितव्य अधांतरीत राहील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.