बाळासाहेबांना ज्यांनी सावलीसारखी साथ दिली त्या चंपासिंह थापा यांची तुम्ही चेष्टा केली. बाळासाहेब ज्यांना सवंगडी समजायचे, त्यांना तुम्ही घरघडी समजलात. पक्षाचा पदाधिकारी, कार्यकर्ता मोठा केल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही. कुणी चांगले कपडे घातले, घर घेतले, गाडी घेतली, तर ते तुम्हाला बघवत नाही. ही कसली वृत्ती. हा शिवसैनिक तुमचा नोकर नाही, याचे भान ठेवा, अशी परखड टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दसरा मेळाव्यात बोलताना केली.
शिंदे म्हणाले, दाऊद आणि याकुबचे हस्तक होण्यापेक्षा मोदी-शहांचे हस्तक होणे कधीही बरे. त्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले, कलम ३७० रद्द केले, राम मंदिर निर्माणाचे काम हाती घेतले. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत. निवडणूका आल्या की यांना मराठी माणूस आठवतो. तो वसई, विरार, कल्याण डोंबिवलीच्या पुढे स्थलांतरीत होत असताना आठवम झाली नाही का, त्यामुळे आता मराठी माणूस त्यांच्या भुलथापांना फसणार नाही.
(हेही वाचा अडीच वर्षांत केवळ अडीच तास मंत्रालयात गेले; शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका)
नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्यासंदर्भात पत्र तयार करायला तुम्ही मला सांगितले. पण, स्थानिकांचा विरोध वाढल्यानंतर माझे नाव पुढे केले. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास एकनाथ शिंदेचा विरोध आहे, असे चित्र तयार केले. पण, स्थानिक सुज्ञ आहेत. त्यांच्यासोबतच्या बैठकीतून तुम्ही किती वेळा उठून गेला, हे त्यांना माहिती आहे. दिबांचा ठराव तुम्ही अल्पमतात असताना केला. आम्ही बहुमतात आल्यानंतर दिबांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. आजवर तुम्ही कुठल्या समाजासोबत राहिलात? मराठा समाजाच्या मोर्चालाही तुम्ही मुका मोर्चा म्हणालात. पण यापुढे या राज्यात कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. सरकार आल्याबरोबर आम्ही अधिसंख्य पदांबाबत निर्णय घेतला. पुढच्या काळात मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
कधी कोणाला चापट तरी मारली आहे का?
आज त्यांनी मला कटप्पा असे नाव दिले आहे. पण हा कटप्पाही स्वाभिमानी, प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आम्ही समोरून वार करणारे आहोत. तुमच्यासारखे पाठीवर वार करणारे नव्हेत. कोथळा काढायची भाषा करता, तुम्ही कधी कोणाला चापट तरी मारली आहे का? माझ्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तुमच्यावर किती, ते सांगा. प्रत्येक शिवसैनिकावर केस आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही. आणि त्यांना गद्दार म्हणता. तुम्ही मुख्यमंत्री, मुलगा मंत्री झाला, आम्ही काही बोललो नाही. हे पद एखाद्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यालाही देता आले असते. आता पायाखालची वाळू सरकली म्हणून वाट्टेल ते बोलता आहेत, अशी टीकाही शिंदे यांनी केली.
(हेही वाचा त्यांनी मैदान जरी मिळवलं, तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार आमच्यासोबत; एकनाथ शिंदेंचा पलटवार)
Join Our WhatsApp Community