अडीच वर्षांत केवळ अडीच तास मंत्रालयात गेले; शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका

145

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अडीच वर्षांच्या कार्यकाळात ते अडीच तास मंत्रालयात गेले. अशाने राज्याचा कारभार कसा चालणार? तुमचा कारभार कोणालाही आवडत नव्हता. कोरोनाच्या नावावर सगळे बंद केले, पण तुमचे सगळे उद्योग सुरू होते. हे माझ्याशिवाय आणखी कोणाला चांगले माहिती असणार. मुख्यमंत्री तुम्ही असलात, तरी सेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा अशी सरकारची स्थिती होती, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केली.

मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायची होती, म्हणूनच ते शिवसेनेचे पानीपत उघड्या डोळ्यांनी पाहत राहीले. हा निर्णय घेताना आम्हालाही वेदना झाल्या. पण अडीच वर्षांची जी खदखद होती, त्याचा उद्रेक कधीना कधी होणार होता. त्याची दखल जगातील ३३ देशांनी घेतला. असे निर्णय घ्यायला धाडस लागले. वेडे लोकच इतिहास घडवतात. भाजप बरोबर जायचे होते, तर राजीनामे द्यायला हवे होते, असे ते म्हणत आहे. मग जनादेश डावलून महाविकास आघाडीसोबत जाताना का राजीनामे दिले नाहीत, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

(हेही वाचा शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना माझी – एकनाथ शिंदे)

पीएफआय विषयी त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. कारण कॉंग्रेला वाईट वाटेल, याची भीती त्यांना होती. पण या राज्यात असल्या कुठल्याही संघटनांना थारा देणार नाही. त्यांचा बिमोड करू, असेही शिंदे म्हणाले. या देशाच्या उभारणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे योगदान आहे. जेव्हा आपत्ती, संकटे येतात, तेव्हा आरएसएसचे स्वयंसेवक छातीची ढाल करून उभे राहतात. त्यांची तुम्ही पीएफआयशी तुलना करता, याची लाज वाटली पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

शिवसेना ही तुमची खासगी मालमत्ता नव्हे

बाळासाहेब आणि शरद पवारांची मैत्री होती. पण सत्तेसाठी त्यांनी कधी हातमिळवणी केली नाही. तुम्ही आजवर त्यांना शिव्या दिल्या. पण २०१९ ला त्यांच्याशीच युती केली. वैचारिक विरोधकांच्या गळ्यात गळे घातलेत. पण ते आपले गळे कापायला निघाले, तेव्हा तुम्हाला जाग आली नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न सुरू होता. पण पक्षप्रमुख सतत दुर्लक्ष करीत होता. बाण गेले, पण धनुष्य माझ्याकडे आहे, असे ते म्हणत आहेत. ही शिवसेना तुमची खासगी मालमत्ता नाही. ती शिवसैनिकांच्या घामाची सेना आहे. तिला कुणाच्याही दावणीला बांधता येणार नाही. आता तरी डोळे उघडा, असेही शिंदे म्हणाले.

(हेही वाचा त्यांनी मैदान जरी मिळवलं, तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार आमच्यासोबत; एकनाथ शिंदेंचा पलटवार)

त्यांचे कुटुंब ‘हम दो, हमारे दो’

शरद पवारांनी अट घातली म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री व्हावे लागले, असे तुम्ही सांगता. पण याविषयावर माझ्याशी तुमचे काय बोलणे झाले, हे उघडपणे सांगितले तर काय होईल याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. एकनाथ शिंदे हा देणारा आहे, घेणारा नाही, हे ध्यानात घ्या. बाळासाहेबांच्या पश्चात नेते, पदाधिकारी, शिवसैनिकांची अवहेलना सुरू झाली. त्यांना मातोश्रीच्या दारातही उभे केले जात नव्हते. सत्ता गेल्यानंतर ते शाखाप्रमुख, गटप्रमुख, विभागप्रमुखांना भेटत आहेत. माझ्यामुळे तुम्ही फिरायला लागलात याचा आनंद, पण आता वेळ निघून गेली आहे. शिवसैनिक हे बाळासाहेबांचे कुटुंब होते. पण तुमचे कुटुंब ‘हम दो, हमारे दो’ पुरते मर्यादीत राहीले. तुम्ही वर्क फ्रॉम होम करीत होता आणि आमचे कामच कधी संपत नाही. हाच फरक आहे. ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालत आहोत, असेही शिंदे म्हणाले.

(हेही वाचा वीर सावरकरांच्या अवमानाविरोधात ठराव का आणला नाही? मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.