दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळाल्यावर त्यांनी उलटसुलट टीका सुरू केली. पण, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझी होती. त्यामुळे मैदानाच्या विषयात मी हस्तक्षेप केला नाही. त्यांनी मैदान जरी मिळवले असले, तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार आमच्यासोबत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडीत काढले. त्यामुळे त्या पवित्र जागेवर उभे राहण्याचा नैतिक अधिकार तुम्ही गमावला आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला.
बीकेसी येथे आयोजित दसरा मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. शिंदे म्हणाले, इथे उसळलेला अथांग जनसमुदाय पाहून आता प्रत्येकाच्या मनातील गोंधळ दूर होईल. आजच्या या गर्दीने खरी शिवसेना कोणाची, हे जगाला दाखवून दिले आहे. हा एकनाथ शिंदे मुख्यंमंत्री झाला, तरी आजही तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा ध्यास घेतल्यामुळे राज्यातील जनताही आमच्यासोबत आहे.
(हेही वाचा वीर सावरकरांच्या अवमानाविरोधात ठराव का आणला नाही? मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
गद्दार आणि खोक्यांच्या पलिकडे त्यांच्याकडे तिसरा शब्द नाही. होय, गद्दारी झाली. ती म्हणजे २०१९ ला. निवडणुकीच्या निकालानंतर जी महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हा बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि मतदारांच्या कौलाशी गद्दारी झाली. एका बाजूला बाळासाहेब आणि दुसऱ्या बाजुला मोदींचा फोटो लावला. त्यामुळे लोकांनी युतीला मतदान केले. पण त्यांच्या मताला तुम्ही नाकारले. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली, विश्वासघात केला आहे. आम्ही केलेली गद्दारी नव्हे, गदर आहे. गदर म्हणे क्रांती, उठाव. आम्ही गद्दार नव्हे, बाळासाहेबांचे सैनिक आहोत, हे छातीठोकपणे सांगू शकतो, अशी टीका शिंदे यांनी केली.
शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण
हजारो शिवसैनिकांनी घाम, रक्त सांडून जो पक्ष निर्माण केला, तो तुम्ही वैयक्तिक फायद्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण टाकला. त्यांच्या तालावर स्वतः नाचलात आणि आम्हालाही नाचवले. परंतु, बाळासाहेबांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी, शिवसेना जपण्यासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही वेगळी भूमिका घेतली. ती जाहीरपणे घेतली, लपूनछपून नव्हे. त्यामुळेच आम्हाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community