खरी शिवसेना कोणाची, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. पण, शिवसेना ना उद्धव ठाकरेंची आहे, ना एकनाथ शिंदेंची. ती फक्त बाळासाहेबांच्या विचारांची आणि तमाम शिवसैनिकांची आहे. आम्हाला सत्तेपेक्षा तत्व महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांचे खरे वारसदार हे विचारांचे वारसदार आहेत आणि ते इथे जमलेले शिवसैनिक आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीतील दसरा मेळाव्यात बोलताना केली.
गद्दार आणि खोक्यांच्या पलिकडे तिसरा शब्द नाही. होय गद्दारी झाली आहे. गद्दारी झाली आहे ती २०१९ ला झाली आहे. निकाल आल्यानंतर जी आघाडी झाली त्यावेळी खरी गद्दारी झाली. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि मतदारांच्या कौलाशी गद्दारी केली. प्रचारावेली एका बाजूला बाळासाहेब आणि दुसऱ्या बाजुला मोदींचा फोटो लावला. त्यामुळे लोकांनी युती म्हणून मतदान केले. पण त्यांच्या मताला तुम्ही नाकारले. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही गद्दारी, विश्वासघात केला आहे. आम्ही केलेली गद्दारी नव्ही, गदर आहे. गदर म्हणे क्रांती, उठाव. आम्ही गद्दार नव्हे, बाळासाहेबांचे सैनिक आहोत, हे छातीठोकपणे सांगू शकतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचा त्यांनी मैदान जरी मिळवलं, तरी शिवसेनाप्रमुखांचे विचार आमच्यासोबत; एकनाथ शिंदेंचा पलटवार)
बापाला विकणारी टोळी म्हणायचे का?
आम्हाला गद्दारांची टोळी म्हणतात. पण, तुम्ही बापाचे विचार विकले. मग तुम्हाला बापाला विकणारी टोळी म्हणायचे का? खरे गद्दार कोण, हे जनतेला समजले आहे. त्यामुळे लोक आमच्यासोबत आहेत. तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात. ज्या याकूब मेमनने मुंबईत बॉम्बस्फोट घडवले, त्याची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या आमदाराला तुम्ही मंत्रिपद देता, यावरून तुमचे हिंदुत्व समजले. आम्हाला गद्दार म्हणता. तुम्ही गद्दारी केली, तुम्ही गद्दार आहात. तुम्ही जे पाप केले आहे, त्याबद्दल आधी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर माथा टेका आणि नंतरच आमच्यावर टीका करा, असेही शिंदे म्हणाले.
आत्मपरीक्षण करा…
कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर अडीच वर्षे गप्प का बसले, असा सवाल ते विचारत आहेत. पण, ज्यावेळी सरकार बनत होते, त्यावेळी अनेक आमदार सांगत होते, ही आघाडी चुकीची आहे. शिवसेनेला खड्ड्यात घालणारी आहे. परंतु, आम्ही आदेश मानणारे कार्यकर्ते असल्याने त्यांचा आदेश मानला. मात्र, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचे प्रकार वाढीस लागल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून उठाव करण्याचा निर्णय घेतला. आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी तुमची साथ का सोडली, याचे आत्मपरीक्षण करा. राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासह अनेकजण सोडून गेले. मग हे सगळे चुकीचे की तुम्ही, याचाही विचार करा, असे शिंदे म्हणाले.
(हेही वाचा वीर सावरकरांच्या अवमानाविरोधात ठराव का आणला नाही? मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
Join Our WhatsApp Community