मुंबई पोलीस दलात अगोदरच मनुष्यबळाचा तुटवडा असून त्यात देखील बंदोबस्तासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातून अधिकारी आणि अंमलदार असे १० ते १२ हजार पोलिसांना शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे बंदोबस्त ड्युटी लावण्यात आल्यामुळे पोलीस ठाण्यातील कामाचा ताण तुटपुंज्या असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पडला आहे.
किती पोलीस फौजफाटा?
मुंबईत होणाऱ्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह दोन्ही दसरा मेळाव्याला सुमारे २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. मुंबईत होणारे दोन दसरा मेळावे आणि देवी विसर्जन यामुळे मुंबई पोलीस दलावर अधिक ताण पडला आहे. बंदोबस्ताच्या कामी ३ हजार २०० अधिकारी, १५ हजार दोनशे पोलीस कर्मचारी, दीड हजार राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, एक हजार होमगार्ड, २० शीघ्रकृती दल आणि १५ बॉम्ब स्कॉट्स पथक असे दसरा मेळावा बंदोबस्त कामी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे.
पोलीस दलावर कामाचा अधिक बोजा
९६ पोलीस ठाणे आणि इतर विविध शाखा मिळून मुंबई पोलीस दलात एकूण ४९ हजार पोलीस मनुष्यबळ आहे. त्यात राज्याबाहेर बदली होऊन गेलेले, सुट्टीवर असणारे, आजारी असणारे साडेनऊ हजार पोलीसांचा तुटवडा मुंबई पोलीस दलात असताना दसरा मेळाव्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातून १० ते १२ अधिकारी आणि अंमलदार यांना दसरा मेळावा बंदोबस्त कामी शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे पाठविण्यात आले आहे. उर्वरित पोलिसांवर मुंबईतील इतर ठिकाणचा कायदा सुव्यवस्था सांभाळून दररोज होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे, तक्रारी लिहून घेणे, देवी विसर्जन सोहळा बंदोबस्त असल्यामुळे पोलीस दलावर कामाचा अधिक बोजा पडला आहे
Join Our WhatsApp Community