सोशल मीडियावर डॉ. श्रीकांत शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना लिहिलेलं एक भावनिक पत्र व्हायरल झालेलं आहे. “उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? उद्धवजी तुम्हाला आठवतंय का माझ्या मुलाचा – रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते? माझा उल्लेख तुम्ही ‘कार्टं’ असा केलात. चला, ठीक आहे, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिलं आम्ही. पण तुम्ही हद्दच केलीच. माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून, ‘त्याचा नगरसेवकपदावर डोळा आहे’ असं वक्तव्य केलंत तुम्ही. उद्धवजी, ज्या डोळ्यांत फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यांतून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहाते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत, असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुख्यमंत्री असताना स्वतःला ‘कुटुंबप्रमुख’ म्हणवत होतात ना? मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जिवांचा बाजार मांडणारा असतो? उद्धवजी, कुठे आदरणीय, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कुठे तुम्ही. आदरणीय बाळासाहेबही विरोधकांवर जळजळीत टीका करायचे, पण त्यांनी असली हीन व गलिच्छ टिप्पणी कधीही केली नाही.” अशी पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
पत्राच्या शेवटी “डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, एक दुखावलेला बाप” असं लिहिलं आहे. चिंतेची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंना त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल वाईट वाटत नाही आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते लहान मुलावर केलेल्या टिकेची पाठराखण करत आहेत. म्हणजे हे कोणत्या मातीपासून बनले आहेत. असलं गलिच्छ आणि भिक्कारडं राजकारण महाराष्ट्रात कधीपासून होऊ लागलं?
(हेही वाचा बाळासाहेब नक्की कुणाला प्रिय? उध्दव ठाकरे की एकनाथ शिंदे! रिकाम्या खुर्चीवरून शिवसैनिकांनाच पडलेला प्रश्न)
दसरा मेळाव्याला सबंध ठाकरे कुटुंब एकनाथ शिंदे यांच्या बरोबर होतं. स्मिताताई, निहार ठाकरे, जयदेव ठाकरे देखील शिंदेंना आशीर्वाद द्यायला आले होते. रामदास कदम ह्यांनी हाच प्रश्न विचारला की उद्धवराव तुम्ही स्वतःच्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही तर महाराष्ट्राला, शिवसैनिकांना काय सांभाळणार? उद्धव ठाकरे यांनी सगळी हद्दपार केली आहे. ते मुख्यमंत्री असताना राज्याला वार्यावर सोडून घरी एसीची हवा खात बसले होते आणि चाय बिस्किट पत्रकार त्यांना बेस्ट सीएमची पदवी देण्यात गुंतले होते. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अनेक राजकीय गुन्हे घडले. यांचे कार्यकर्ते पिसाळल्यासारखे विरोधकांना मारहाण करत होते. वडिलांच्या वयाच्या माणसाला मारहाण करताना ह्यांना लाज वाटली नाही. माणुसकी विकून खाल्लेले लोक आहेत हे. हे बाळासाहेबांच्या विचारांपासून लाखो मैल दूर आहेत. बाळासाहेब ठाकरे असते तर ह्यांना त्वरित निलंबित केलं असतं आणि ठाकरी अधिकारवाणीत म्हणाले असते, “ही असली थेरं मी खपवून घेणार नाही, मर्द आहात तर मर्दासारखं वागा.”
पण हे सगळं या महाराष्ट्रात घडलं. संजय राऊत यांनी तर मर्यादाच ओलांडली. पत्रकारांसमोर त्यांनी एका महिलेला हरामखोर म्हटलं, ज्येष्ठ नेत्यांना गलिच्छ शिव्या दिल्या. एकाही पत्रकाराने त्यांना जाब विचारला नाही. कारण हे नेते जे खरकटं टाकायचे त्यावरच ह्या पत्रकारांना घर चालवावं लागतं. ह्यात त्यांचा तरी दोष काय? आता उद्धव ठाकरे ह्यांनी राजकारणातील सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक उद्धव रावांना वैतागले आहेत. म्हणूनच यंदा दसरा मेळाव्याला शिंदेंनी जास्त गर्दी कमावली. केवळ गर्दीच नव्हे तर दर्दीही कमावली आणि थापा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंचावर बसायला देऊन सन्मान दिला.
डॉ. श्रीकांत शिंदे यांचं पत्र खूप बोलकं आहे. बाळासाहेबांबद्दल थोडा जरी आदर असेल तर आपली जीभ घसरली, बोलण्याच्या ओघात आपण बोलून गेलो, लहान मुलाला असं बोलायला नको होतं अशी कबुली देता येईल. जर मनाचा मोठेपणा दाखवला नाही तर जे साम्राज्य काही वर्षांनंतर बुडणार आहे, ते आताच विसर्जित होईल. दीड वर्षाच्या मुलाला राजकारणात ओढून काय साध्य केलंत उद्धव ठाकरे? तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांपासून इतके दूर कसे गेलात?
(हेही वाचा दसरा मेळाव्यात आवाज वाढला कोणाचा? शिंदेंचा की ठाकरेंचा?)
Join Our WhatsApp Community