शिवसेना उध्दव गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुखांनी एकनिष्ठेची भावनिक साद निष्ठावान शिवसैनिकांना घातली. मात्र, दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुखांनी बाहेरुन आलेल्यांना भाषण करण्याची संधी देऊन निष्ठावान असलेल्या आणि ज्यांनी मराठवाड्यांसह विदर्भांमध्ये शिवसेनेची पाळेमुळे मजबूत केली, अशा शिवसेनेची माजी मंत्री दिवाकर रावते यांना मात्र शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली नाही. ज्या एकनिष्ठेच्या नावाखाली शिवसैनिकांच्या निष्ठेचे कौतुक केले, त्याच मेळाव्यात दिवाकर रावते यांच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना भाषणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार शिवसैनिकांना रुचलेला दिसत नाही. दिवाकर रावते हे स्पष्टवक्ते असून ते काही तरी बोलून जातील याच भीतीने पक्षाने एवढे नेते सोडून गेल्यानंतरही त्यांची मदत घेण्याची गरज भासत नाही, याबाबतही शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
म्हणून बाहेरून आलेल्यांना भाषणाची संधी
शिवसेनेचा परंपरा दसरा मेळावा यंदा उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने स्वतंत्रपणे आयोजित केला होता. उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील व्यासपीठावर एकनिष्ठ…आम्ही एकनिष्ठ अशाप्रकारची भावनिक साद घालणारे शब्द लक्ष वेधून घेत होते, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या व्यासपीठावर ‘गर्व सें कहों हम हिंदू है’ अशाप्रकारचे घोषवाक्य लक्ष वेधून घेत होते. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थितांपैकी शिवसेना सचिव माजी मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव आणि आमदार नितीन देशमुख यांची भाषणे झाली. यापैकी सुभाष देसाई व अंबादास दानवे हे शिवसेनेचे असले तरी अंधारे आणि भास्कर जाधव हे बाहेरुन आलेले आहेत. तर नितीन देशमुख हे शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर तिथून पळून आलेल्यांपैकी असल्याने त्यांना भाषण करण्याची संधी दिली गेली. भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांना केवळ विरोधकांवर टीका करण्यासाठीच भाषण करण्याची संधी दिली गेली असे दिसून येत आहे.
(हेही वाचा शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे ११८ बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत)
निष्ठावंतांना डावलले
एकनिष्ठेचा नारा देतानाच व्यासपीठावर बसलेल्या निष्ठावान शिवसेना नेत्यांपैकी दिवाकर रावते, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, गजानन किर्तीकर, खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते. परंतु या एकनिष्ठ शिवसैनिकांपैकी एकालाही या एकनिष्ठेतेचे बिरुद लावून आयोजित केलेल्या या दसरा मेळाव्यात साधे भाषण करण्याचीही संधी दिली गेली नाही. यामध्ये विशेषत: दिवाकर रावते आणि चंद्रकांत खैरे यांना भाषण करण्यास न दिल्याने नक्की एकनिष्ठेचा नारा कुणासाठी होता, असा सवाल काही शिवसैनिकांकडूनही केला जात आहे. दिवाकर रावते आणि चंद्रकांत खैरे हे निष्ठावंत शिवसैनिक असून अनेकदा अमिषे दाखवूनही कधीही त्यांनी शिवसेना सोडण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला नाही. रावते यांनी तर मुंबईतील संघटनात्मक बांधणीसह राज्यातील मराठावाडा, विदर्भांमध्ये पायी फिरत शिवसेनेचा प्रसार केला आणि शिवसेनेची पाळेमुळे मजबूत केली. परंतु शिंदे गट फुटल्यानंतरही रावते यांच्या नशिबी आजही शिवसेनेतील निष्ठेचे फळ काही मिळताना दिसत नाही. यापूर्वीच्या युतीच्या सरकारमध्ये रावते यांना परिवहन मंत्रीपद मिळाले, परंतु महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये रावते यांना बाजुला केले. पण शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदार सोडून गेल्यानंतर रावते आणि खैरे हे उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी सक्षमपणे उभे राहिले. परंतु रावते यांची एकनिष्ठा आजही शिवसेना पक्षप्रमुखांना मान्य नसल्याचे यावरून दिसून आले.
Join Our WhatsApp Community