भाजपचे अमित शहा गृहमंत्री आहेत कि भाजपचे घरगुती मंत्री आहेत, त्याचे सरकार पाड, याचे सरकार पाड, हेच त्यांचे काम. ते म्हणतात शिवसेनेला जमीन दाखवा. आम्ही जमिनीवरच आहोत, आम्हाला जमीन दाखवा, पण ती पाकिस्तानने घेतलेली जमीन दाखवा, चीनने घेतलेली जमीन दाखवा, गद्दाराच्या पालखीत बसून काय मिरवता. मुंबईत महाराष्ट्रात अनेक गुजराती आहेत, सगळेच कामाला गुजरातमध्ये जाणार नाहीत, मोठं मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत आणि हे गप्प आहेत. या सरकारची उद्या शंभरी भरणार आहे, त्यातील ९० दिवस दिल्लीत घालवले असतील, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली.
हिंदुत्व म्हणजे धोतर नाही
हा जिवंत मेळावा आहे, तिकडे रडगाणे आहे, ग्लिसरीनच्या बाटल्या तिकडे गेल्या आहेत. हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, पाहिजे तेव्हा नेसले आणि पाहजे तेव्हा सोडले, आम्ही मरेपर्यंत हिंदूत्ववादी राहणार. पाकिस्तानात न बोलावता जाऊन पंतप्रधानाच्या वाढ दिवसाचा केक खाणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार? हिंदुत्व हे कणखर असले पाहिजे. गाईवर बोलता महागाईवर बोला. गॅस महागला, डाळी महागल्या, असे मंत्र्यांना जाऊन सांगणार, तर ते जय श्रीराम म्हणणार. जय श्रीराम आणि हाताला काम, असे पाहिजे. संघाचे होसबाळे यांनी त्यांना आरसा दाखवला आहे, त्यांचे कौतुक करत आहे. आता त्यातून सुधारणा होईल अशी आशा आहे, नाही तर त्याच आरशात पाहून ते स्वतः भांग पाडत बसतील. त्यांनी देशातील महागाईचा विषय मांडला. रुपया घसरत चालला आहे. कोंबडी चोरावर, बाप चोरावर जास्त बोलायचे नाही. शिव्या देणे सोपे असते, पण विचार देण्याची परंपरा मी पुढे नेत आहे. मोदी सरकार पहिल्यांदा आले, तेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत किती होता, आज ८० रुपयांच्या वरती गेला आहे. सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की, रुपया घसरतो, तेव्हा देशाची पत घसरत असते, आज तिच परिस्थिती आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा आजचा रावण ५० खोक्यांचा खोकासूर, धोकासूर! उद्धव ठाकरेंचा घणाघात)
देश हुकूमशाहीकडे जातोय
हिंदुत्ववावर बोलतांना माझे आव्हान आहे, तथाकथित हिंदुत्ववादी आणि मी एक व्यासपीठावर येतो आणि त्यांनी त्यांचे हिंदुत्व मांडावे, कोणाचे खरे हिंदुत्व समोर येईल. जो या देशावर प्रेम करतो तो मुसलमान माझा आहे, असे शिवसेनाप्रमुख यांनी सांगितले होते. पण आमच्या धर्माशी मस्ती केली तर आम्ही कडवट हिंदू म्हणून उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. तुमचे हिंदुत्व नेमके आहे तरी काय, मी मागच्या दसऱ्या मेळाव्यात सांगितले होते, काश्मिरात औरंगजेब नावाचा जवान होता, त्याचे अपहरण केले आणि अतिरेक्यांनी त्याला ठार केले. मारणारे अतिरेकी मुसलमान होते, ज्याला मारले तो जवान मुसलमान होता. तो सैनिक औरंगजेब आमचा भाऊ आहे. त्याचा भाऊ सैन्यात गेला. त्यांनाही नाकारणार का, देशात लोकशाही धोक्यात आली आहे, देश हुकूमशाहीकडे जात आहे. देशात पुन्हा गुलामगिरी येणार आहे. देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे.
(हेही वाचा आमचा दसरा मेळावा, त्यांचा कचरा मेळावा, भास्कर जाधवांचा हल्लाबोल)
पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवीन
मोहन भागवत मधल्या काळात मशिदीत जाऊन आले, त्यांनी हिंदुत्व सोडले का? तर नाही. ते संवाद साधण्यासाठी गेले मशिदीत गेले, तेव्हा मुसलमान म्हणाले की, मोहन भागवत राष्ट्रपिता आहेत. आम्ही काँग्रेससोबत गेलो, तर आम्ही हिंदुत्व सोडले, मग मोहन भागवत यांनी हिंदुत्व सोडले का? मोहन भागवत आज स्त्री – पुरुष समानता याविषयावर बोलले. पण उत्तराखंड येथे अंकिता भंडारी या अल्पवयीन मुलीचा खून झाला, त्यात भाजपचा पदाधिकारी आरोपी आहे, हाच का महिला शक्तीचा सन्मान? त्याच्यावर काय कारवाई केली? फासावर लटकावणार का? बिल्किस बानो गर्भवती असताना तिच्यावर बलात्कार केला, तिच्या मुलाचा खून केला, त्या त्या आरोपींना सोडून देण्यात आले, हाच का महिला सन्मान? स्त्री बरोबर लढायचे नाही ही शिकवण देणारे आमचे हिंदुत्व आहे, ते आम्ही सोडून देणार नाही. आमच्याकडे हिंदुत्व जागृत करून मिळेल, असे कार्टून आले होते, ईडी कार्यालयातील ती पाटी होती. बाळासाहेबांचा चेहरा लावून तोतये शिवसेना पळवून न्यायला निघाले आहेत. मैदानही द्यायला आडकाठी आणत होते. आता धनुष्यबाण पाहिजे, बाळासाहेब पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना बाजूला अजित पवार बसायचे, कधी त्यांनी माझा माईक खेचला नाही, अडीच वर्षे मानसन्मान दिला. काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले म्हणतात, पण औरंगाबादचे संभाजीनगर केले, ते दोन्ही काँग्रेस सोबत असतानाच केले. मी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण केले, तेव्हा दोन्ही काँग्रेसने होकार दिला, त्यांना घेऊन हिंदुत्व वाढवत होतो. मी पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवीन. बांडगुळे छाटली गेली हे चांगले झाले, बांडगुळांना माहित नव्हते त्यांची मुळे वृक्षाच्या फांदीत आहेत, पण ती फांदी ज्या वृक्षाची आहे त्या वृक्षाची मुळे जमिनीत खोलवर रुजलेली आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा ‘माझा बाप चोरला’ म्हणणारे जगातील एकमेव उदाहरण, राहुल शेवाळेंचा हल्लाबोल )
Join Our WhatsApp Community