अनेक दसरा मेळावे माझ्या लक्षात आहेत, पण असा अभूतपूर्व मेळावा झाला नाही, हा मेळावा पाहून मी भारावून गेलो आहे. तुमचे हे प्रेम पाहिल्यावर मुद्दे असले तरी शब्द सुचत नाही, हे प्रेम विकत, ओरबाडून मिळत नाही. ही गर्दी जीवा भावाची आहे. याच शिवतीर्थावर शपथ घेताना मी नतमस्तक झालो होतो, अनुभव नसताना अडीच वर्षे कारभार केला. डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिली नाही, पण तरीही तुमच्या समोर नतमस्तक झालो आहे. कारण हे जिवंत कवच माझ्याभोवती आहे. गद्दारांनी गद्दारी केली, मंत्री पदे तुमच्या बुडाला चिकटली, तरी तुमच्या कपाळी लागलेला गद्दारीचा शिक्का आयुष्यभर राहणार आहे. मला शिवसेनेची काळजी नाही, इकडे एकही माणूस भाड्याने आणि तासाची बोली लावून आणला नाही. सर्व वयोगटातील इथे जमले आहेत. इथे सगळे एकनिष्ठ आहेत. तिकडे एकटाच आहे. ही ठाकरे कुटुंबाची कमाई आहे. आपल्या मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे, यावेळीच रावण वेगळा आहे, हा दहा तोंडाचा नाही, तर तो ५० खोक्यांचा खोकासूर धोकासूर आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात शिंदे गटावर केला.
आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरे पाळायचे
मी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, तेव्हा कटप्पांनी मी कधी उठणार नाही, याचे प्रयत्न केले, पण जगदंबेची शक्ती माझ्या पाठीशी आहे. त्यांना मंत्री पदे दिले, आमदारक्या , खासदारक्या दिल्या, त्यांच्यामुळे मी ज्यांना काही दिले नाही, ते आज माझ्यासोबत आहेत. ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही ती मर्द शिवसैनिकांची आहे. तुम्ही ठरवणार मी पक्षप्रमुख पदी राहायचे कि नाही, तुम्ही म्हणाला तर मी पायउतार होईन. बाप आमदार, मुलगा खासदार, आणि नातवाला नगरसेवक करायचे आहे, त्याला शाळेत तरी जाऊ दे. भाजपाने पाठीत वार केला, म्हणून महाविकास आघाडी केली होती, मी हिंदुत्व सोडले नाही, मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यालाही बाजूला घेऊन मान राखला होता तेव्हा त्याने का नकार दिला नाही? मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचे ठरले होते, आज जे केले तेव्हाच तुम्ही का केले नाही? शिवसेना संपवायची आहे. आमदार, खासदार केला, मंत्री बनवला, आता शिवसेनाप्रमुख व्ह्यायचे आहे, त्याला शिवसेनाप्रमुख बनवणार आहात का? बाप चोरणारी अवलाद. स्वतःच्या बापाचा तरी विचार करावा. आनंद दिघे, २० वर्षे एकनिष्ठ शिवसैनिकाला जाऊन झाले, जातानाही ते भगव्यातून गेले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कायदा चांगला कळतो, हा टोमणा नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री होते, जाताना म्हणाले मी पुन्हा येईन, दीड दिवस आले आणि विसर्जन झाले, मनावर दगड ठेवून उपमुख्यंमत्री म्हणून आले, हा टोमणा नाही. ते म्हणतात कायद्याच्या चौकटीत राहून बोला. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरे पाळायचे का? रस्त्यावर गोळीबार करतात, निवडून निवडून मारू असे म्हणतात, त्यांना नाही कायदा शिकवत, नवी मुंबईत पोलीस धमक्या देत आहेत, हा तुमचा कायदा? तडीपारी करतात, उद्योग धंदा नाही का, शांत राहा म्हणून सांगतो म्हणून शिवसैनिक शांत आहेत, त्यांना पिसाळयाला सांगू नका, जर शिवसैनिकांवर अन्याय कराल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
Join Our WhatsApp Community