आमदार सदा सरवणकर कुठला ‘मार्ग’ निवडणार?

125

माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर हे दसरा मेळाव्याला जाण्यासाठी कुठला मार्ग निवडणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सरवणकर यांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्याला जाण्यासाठी वरळी – वांद्रे सी लिंक मार्ग जावे, अशी विनंती मुंबई पोलिसांकडून सरवणकर यांना करण्यात आली आहे. परंतु सदा सरवणकर हे दसरा मेळाव्याला माहीमच्याच मार्गाने जाण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस सतर्क

शिंदे गट आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा एकाच दिवशी आणि एकाच वेळी होणार असला, तरी दोन्ही ठिकाणे मात्र वेगळी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात दसरा मेळावा घेणार आहे, तर ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांच्या वेळा देखील सारख्याच आहेत. हे दोन्ही मेळावे शांततेत पार पडावेत, तसेच दोन्ही गटांत कुठलाही राडा होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. मेळाव्याला येताना तसेच मेळावा संपवून घरी जाताना दोन्ही गट समोरासमोर येऊ नये यासाठी मुंबई पोलिसांकडून दोन्ही गटांचे मार्ग बदलले असल्याचे कळते. शिवाजी पार्क आणि बीकेसीला मेळाव्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची वाहने पार्क करण्यासाठी ठिकाणे निवडण्यात आलेली आहेत. पोलीस सूत्राच्या दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी कलिना येथील मुंबई विद्यापीठ येथील मोकळी जागा निवडण्यात आलेली असून ठाकरे गटाच्या वाहनांसाठी सोमय्या मैदान निवडण्यात आले असल्याचे समजते.

(हेही वाचा ‘काश्मीर फाईल्स’नंतर आता गांधी फाईल्स… गांधी हत्येमागील सत्य उलगडणार?)

…तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

माहीम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर हे शिंदे गटाकडे गेल्यामुळे दादर – माहीम परिसरातील शिवसैनिक आणि सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांत धुसफूस सुरु आहे. गणेशोत्सवात हे दोन्ही गट दादर पोलीस ठाण्याच्या आवारात एकमेकांशी भिडले होते, तेव्हापासून शिवसैनिक हे सरवणकर यांच्यावर भडकले आहेत. सरवणकर यांचे निवासस्थान हे शिवाजी पार्क मैदानाच्या समोर आहे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क येथे होणार असल्यामुळे पोलिसांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. दरम्यान दादर – माहीममधील शिंदे गट बीकेसीला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सरवणकर यांच्या निवासस्थानी जमणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते, तसेच बीकेसीला मेळाव्याला जाण्यासाठी सदा सरवणकर हे माहीमचा मार्ग निवडणार असल्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्यात येत आहे. सरवणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बीकेसी येथे दसरा मेळाव्याला जाण्यासाठी वरळी – वांद्रे सी लिंक या मार्गाचा वापर करावा अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे. परंतु सदा सरवणकर हे मात्र माहीममार्गे जाण्यासाठी ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार सरवणकर हे मेळाव्याला माहीम मार्गे जाण्यासाठी ठाम असतील आणि त्याच वेळी ठाकरे गट समोरासमोर येऊ शकतो, त्यावेळी दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यासाठी आम्ही सरवणकर मार्ग बदलण्याची विनंती करीत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.