मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) हे १८ फेब्रुवारी या दिवशी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आता ज्ञानेश कुमार (Dyanesh Kumar) हे देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. यासंदर्भात शासनाने अधिसूचना प्रसारित केली आहे. त्यात म्हटले आहे की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा कार्यकाळ) कायदा-२०२३ च्या कलम ४ च्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची सोमवार, १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी दिल्लीत बैठक झाली. यानंतर, पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या (सीईसी) नावाची शिफारस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात आली. पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे देखील या समितीचा भाग होते.
स्वतः निवड समितीमध्ये असूनही राहुल गांधी यांनी या निवडीसाठी असहमती पत्र पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयात या मुद्द्यावर सुनावणी असल्याने त्यांनी यापूर्वी बैठक पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे. १९ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी होणार आहे.
कोण आहेत ज्ञानेश कुमार ?
ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशचे असून निवृत्तीनंतर त्यांना १४ मार्च २०२४ ला लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून घेण्यात आले होते. ज्ञानेश कुमार हे जानेवारी २०२४ मध्ये सहकार मंत्रालयाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले होते. संसदीय कामकाज विभागाचे सचिव, गृह खात्याचे सह सचिव आणि अतिरिक्त सचिव म्हणून ज्ञानेश कुमार यांनी काम केले आहे. याशिवाय त्यांनी केरळमध्ये कार्यरत असताना विविध विभागांमध्ये काम केले आहे. सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागाचं कामकाज पाहिले आहे.
२०१८ ते २०२१ मध्ये ज्ञानेश कुमार यांनी ३७० कलम हटवण्यामध्ये आणि जम्मू काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेत महत्त्वाचे योगदान दिले होते. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्मितीत देखील त्यांनी योगदान दिले आहे. (Chief Election Commissioner)
Join Our WhatsApp Community