मुंबई काँग्रेसमध्येही घराणेशाही, अनेक जण नाराज!

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे भाचे अनंत जाधव यांना सचिव पदी नियुक्ती केल्याने मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या भावाकडे महासचिव पदाची जबाबदारी दिल्याने ते यावर गप्प असल्याचे खासगीत बोलले जात आहे.

राजकारणात घराणेशाही होत असल्याचा आरोप गेली अनेक वर्षे सुरू असून, काँग्रेसमध्ये तर आजवर दिल्लीपासून-गल्लीपर्यंत घराणेशाही होत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा उफाळून आला असून, हल्लीच काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या भाई जगताप यांच्यावर आता हा आरोप दबक्या आवाजात होत आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे भाचे अनंत जाधव यांना सचिव पदी नियुक्ती केल्याने मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर भाई जगताप हे युनियनच्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकारी बनवत असल्याचा आरोप काही वरिष्ठ खासगीत बोलताना करू लागले आहेत. विशेष बाब म्हणजे ज्यांचे पक्षात कोणतेही योगदान नाही त्यांना फक्त भाई जगताप यांच्या जवळ असल्यानेच जबाबदारी दिली जात असल्याचे काही वरिष्ठ नाराज पदाधिकारी खासगीत बोलत आहेत.

उत्तर भारतीय वरिष्ठ नेत्यांना डावलले!

सध्या मुंबई काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कारभारामुळे काही उत्तर भारतीय वरिष्ठ नेते नाराज असून, सध्या या उत्तर भारतीय नेत्यांचे राजीनामा सत्र देखील सुरू झाले आहे. दरम्यान मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे देखील या सर्व प्रकरणावर मूग गिळून गप्प असल्याचे संजय निरुपम यांचे समर्थक खासगीत बोलत आहेत. संजय निरुपम यांच्या भावाकडे महासचिव पदाची जबाबदारी दिल्यानेच ते गप्प असल्याचे खासगीत बोलले जात आहे.

(हेही वाचा : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेचा झटका : विशेष समित्यांवरील सदस्य संख्या घटवली!)

या उत्तर भारतीय नेत्यांकडे दुर्लक्ष!

बी.के. तिवारी, मनोज दुबे, कृपाशंकर पांडे, किशोर सिंह, रत्नेश सिंह, सतीशचन्द्र राय, सुरेश ठाकुर, इनायत अली, ताज मोहम्मद, देवी सिंह, अनीस संकला, मनोज सिंह, संदीप सिंह, राणा संग्राम सिंह भंवर सिंह राजपुरोहित, डॉ. राजेंद्र सिंह, चंद्रशेखर दुबे यांच्यासारखे अनेक ज्येष्ठ नेते सध्या मुंबई काँग्रेसमध्ये दुर्लक्षित आहेत.

अरुण सावंत यांचाही राजीनामा!

मुंबई कॉंग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी देखील नाराज होऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नाही तर कमिटीमध्ये स्थान नसलेल्या आनंद शुक्ला यांनी देखील पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संकटाच्या काळात पक्षासोबत राहणाऱ्यांना कोणतेही पद न देणे हा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी देखील उत्तर भारतीय नेत्यांना स्थान न दिल्याने देखील काही ज्येष्ठ नेते नाराज आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here