मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. आयकर विभागाने नोटीस पाठवल्यानंतर शुक्रवारी यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर जाधव यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाने कारवाई केली. परंतु यशवंत जाधव यांच्यावर ही झालेली पहिच कारवाई नाही तर यापूर्वीही यशवंत जाधवांवर आयकर विभागाने कारवाई करत त्यांना रडावर घेतले होते.
जाणून घ्या कोणतं आहे ते प्रकरण
यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी यामिनी जाधव यांनी कोलकत्ता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असून यापूर्वी आयकर विभागाने त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. आयकर विभागाने केलेल्या तपासात कोलकाता येथील शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमावले, असा दावा करण्यात आला होता.
(हेही वाचा – मोठी बातमी! तपास यंत्रणेच्या रडारवर आता शिवसेनेचा ‘हा’ नेता)
मिळालेल्या माहितीनुसार, यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे जाधव यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले होते. मात्र तपासात प्रधान डीलर्स ही एक शेल कंपनी असल्याचे स्पष्ट झाले होते. यामिनी जाधव 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगत असल्या तरी हा पैसा त्यांचा स्वत:चाच होता, असे आयकर विभागाने म्हटले आहे. महावर यांनी सन 2011-12 मध्ये प्रधान डीलर्स कंपनीची स्थापना केल्याचे महावर यांनी चौकशीत सांगितले होते. यात पैसा कमावल्यानंतर कंपनी जाधव कुटुंबाला विकण्यात आली होती. यासह 2019 च्या निवडणुकीत यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याडकडे 7.5 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. यामध्ये 2.74 कोटींची जंगम मालमत्ता होती. तर आपले पती यशवंत जाधव यांच्याकडे 4.59 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले होते. यामध्ये 1.72 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे.