राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. २०२४ ला विरोधकांची मोट बांधून भाजपाला तुल्यबळ आव्हान देण्याची रणनीती आखणाऱ्या शरद पवारांना जबर धक्का मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय दर्जा’चा काढून घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. राष्ट्रवादीसह तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला नोटीस पाठवून केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या ‘राष्ट्रीय दर्जा’ बाबत फेरविचार सुरू केला होता. नियमानुसार राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून पक्षांच्या दर्जाबाबत समीक्षा केली जाते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीसह बसप आणि भाकपच्या राष्ट्रीय दर्जाबाबत फेरविचार सुरू झाला होता. मात्र त्यावेळी निवडणूक आयोगाने आणखी एक निवडणूक चक्र (पाच वर्षे) थांबण्याचा निर्णय घेतला.
२०१९च्या लोकसभा निवडणूक निकालांनंतर पुन्हा एकदा ही समीक्षा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सुनावणी अंती सोमवारी १० एप्रिलला राष्ट्रवादीसह तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. तसेच आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. दरम्यान, ‘राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा असल्यास सर्व राज्यांमध्ये पक्षाला एकच निवडणूक चिन्ह मिळते. तसेच नवी दिल्लीमध्ये कार्यालयासाठी जागा दिली जाते. पक्षविस्तारासाठी ही बाब महत्त्वाची असते.
राष्ट्रीय दर्जाचे निकष
- किमान चार राज्यांमध्ये ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून मान्यता आवश्यक
- किमान तीन राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागांवर विजय
- लोकसभेमध्ये किमान चार जागा आणि किमान सहा टक्के मते किंवा किमान चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मते
- किमान तीन राज्यांत लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागांवर विजय
- यापैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा दिला जातो
(हेही वाचा – शिवसेना भवनसह शाखा ताब्यात द्या; सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल)
Join Our WhatsApp Community