सध्या गुजरात विधानसभा निवडणुकांची संपूर्ण देशभरात चर्चा होत आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकांची तारीख केव्हा जाहीर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुजरात निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
दोन टप्प्यांमध्ये गुजरात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबरला गुजरात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत, तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन गुजरातमध्ये कोणाची सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट होणार आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने याबाबत घोषणा केली आहे.
गुजरातमध्ये गेल्या 25 वर्षांपेक्षा जास्त काळ भाजपची सत्ता असून, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गुजरातमध्ये पूर्ण ताकद लावली होती. पण या निवडणुकीत भाजप,काँग्रेस आणि आप यांच्यात तिहेरी लढत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कसे आहे संख्याबळ
गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. यामध्ये सध्या भाजपकडे 111,काँग्रेसकडे 63 तर अपक्ष आणि इतर पक्षांकडे 8 जागा आहेत. 2017 च्या निवडणुकीत आपला गुजरातमध्ये भोपळा देखील फोडता आलेला नाही. पण पंजाब आणि दिल्ली या दोन राज्यांतील सत्ता स्थापनेनंतर अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकांसाठी शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे यावेळी भाजपला आपचे आव्हान असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपला बढती,काँग्रेसची अधोगती
2017 च्या विधानसभा निवडणुकीत 25 वर्षांत पहिल्यांदाच भाजपला 100 पेक्षा कमी 99 जागांवर समाधान मानावे लागले होते. पण कांग्रेसमधील अतर्गत कलहामुळे 9 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे सर्व रिक्त जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला. तसेच इतरही काही आमदार भाजपमध्ये सामील झाल्यामुळे भाजपचे संख्याबळ 111 झाले तर काँग्रेसची अधोगती होऊन काँग्रेसच्या 63 जागा झाल्या. त्यामुळे आता 2022 च्या निवडणुकीत गुजरातची जनता कोणाच्या हाती सत्ता देणार हे 8 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.
Join Our WhatsApp Community