ED चा रोहित पवारांना धक्का; कन्नड साखर कारखान्याची १६१ एकर जमीन जप्त

195

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने (ED) मोठा धक्का दिला आहे. बारामती अग्रोने खरेदी केलेला कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे रोहित पवार आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणी रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अग्रो संबंधित छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्यातील १६१.३० एकरची जमीन जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लान्ट, साखर कारखान्याची इमारत आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे.

नेमके प्रकरण काय?

राज्यात २००१ ते २०११ या काळात २३ सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेने तारण न घेता कर्जे दिली होती. ही कर्जे एनपीए (अनुत्पादक) मध्ये गेली. त्यानंतर ते कारखाने नेत्यांनी विकत घेतले. त्यासाठी पुन्हा शिखर बँकेनेच कर्जे दिली. यामध्ये बँकेला एकूण २ हजार ६१ कोटी रुपयांचा फटका बसला होता. अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. याच बँकेकडून बारामती अॅग्रोने बँकेकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते.

(हेही वाचा Atal Setu वर कारवाईचा धडाका; वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या २ हजार चालकांवर कारवाई)

अनेक नेते आरोपी

ईडीने (ED) शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या कारखान्याची किंमत ही ५० कोटी २० लाख इतकी आहे. या प्रकरणी १६१ एकर जमीन ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे २०१९ मध्ये मुंबई पोलिसांनी अजित पवारांनाही अटक केली होती आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्यात इतर ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.