ईडीच्या कारवाईमागे राजकीय वास येतोय! एकनाथ खडसेंच्या आरोप

भोसरी येथील ज्या भूखंडाचा व्यवहार झाला आहे, त्याचा मालक खासगी व्यक्ती आहे, तसे कागदपत्रे आहेत, व्यवहार होईपर्यंत त्या जमिनीचा मालकी हक्क एमआयडीसीकडे नव्हता, असे एकनाथ खडसे म्हणाले.

68

भोसरी  भूखंड प्रकरणाची पाच वेळा चौकशी झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यावर क्लीन चिट दिली आहे, तरीही ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. जेव्हा मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून ईडीची चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे ईडीच्या कारवाईच्या मागे आपल्याला राजकीय वास येत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केला.

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केल्यानंतर ईडीने खडसे यांना गुरुवारी, ८ जुलै रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजावला. त्याआधी राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅण्डलवरून खडसे यांची प्रकृती खालावली असल्याचे सांगितले होते, त्यामुळे खडसे ईडीच्या कार्यालयात जाणार नाहीत, अशी शक्यता होती, मात्र खडसे सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले, त्याआधी त्यांनी माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली.

(हेही वाचा : खडसेंना ईडीचे समन्स : प्रकृती खालावली, पत्रकार परिषदही केली रद्द!)

भोसरी भूखंड व्यवहार खासगी! 

मुळात भोसरी येथील ज्या भूखंडाचा व्यवहार झाला आहे, त्याचा मालक खासगी व्यक्ती आहे, तसे कागदपत्रे आहेत, व्यवहार होईपर्यंत त्या जमिनीचा मालकी हक्क एमआयडीसीकडे नव्हता, तसेच एमआयडीसीकडून भूसंपादनाचाही प्रयत्न झाला नव्हता, हा संपूर्ण व्यवहार खासगी व्यवहार असतात त्याची चौकशी करण्यात आली. व्यवहार झाल्यानंतर एमआयडीसीने भूखंडावर दावा केला आहे. या प्रकरणाची आयकर विभागाकडूनही चौकशी झाली आहे, असेही खडसे म्हणाले.

आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न! 

या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. हा भूखंड माझी पत्नी आणि जावई  यांनी खरेदी केला आहे. खासगी व्यवहाराची चौकशी होत आहे. तरीही आपण तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार आहे. आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असेही खडसे म्हणाले.

एकनाथ खडसे यांची ९ तासांच्या चौकशीनंतर सुटका

ईडीच्या कार्यालयात गेल्यावर ९ तास चौकशी केल्यानंतर खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी ‘आमच्याकडून ईडीला पूर्णपणे सहकार्य करण्यात आले असून यापुढे देखील त्यांना सहकार्य करण्यात येईल, जेव्हा जेव्हा ईडीचे अधिकारी चौकशीसाठी बोलावतील त्या त्या वेळी चौकशीसाठी हजर राहू, असे म्हटले. तसेच ईडीने भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहाराचे कागदपत्रे १० दिवसांच्या आत ईडीच्या कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे, ज्या वेळी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात येईल, त्यावेळी हजर राहावे लागणार असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले असल्याचे वकील मोहन टेकवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.