एकेकाळी भाजपची तोफ म्हणून विधानसभेत ओळखले जाणारे आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केली. ईडीने चौधरी यांना मंगळवारी, ६ जुलै रोजी चौकशीसाठी बोलवले होते. तब्बल १३ तास रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांची अधिकृत अटक जाहीर करण्यात आली. पुणे येथील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करताना ‘ईडी लावाल सीडी लावेन’, असा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा दणका मानला जात आहे.
हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगचे! – अंजली दमानिया
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोसरीमध्ये भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. याआधी ईडीने एकनाथ खडसेंची चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांची ईडीने 13 तास चौकशी केली. बुधवारी, ७ जुलै रोजी सकाळी ईडीने गिरीश चौधरींना अटक करण्यात आल्याचे जाहीर केले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, खरे तर ईडीने चौधरी यांना सर्वात आधी चौकशीसाठी बोलावणे गरजेचे होते, त्यामुळे ही अटक आधीच झाली असती. पण राजकारण म्हणून ईडी खडसेंनाच बोलावत होती. वास्तविक हा मनी लॉन्ड्रिंगचा विषय आहे. एका कंपनीच्या खात्यातून खडसेंचे जावई आणि पत्नीच्या खात्यात पैसे जमा झाले, त्यानंतर त्यांनी हा भूखंड खरेदी केला आहे. त्यामुळे यात खडसेंची चौकशी करण्यात काहीच अर्थ नाही, असे दमानिया म्हणाल्या.
(हेही वाचा : ओबीसीच्या मुद्यावर महापालिका निवडणुकीचे भवितव्य!)
काय आहे भोसरी जमीन खरेदीप्रकरण?
- भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर भूखंड खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी खरेदी केली
- चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून जमीन खरेदी केली, तीन कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी केली
- पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद केली, स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले
- ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचे उघड झाले, रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप झाला
- प्रकरणी ईडीकडून आधी एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती