दाऊद कनेक्शनच्या आरोपाखाली ईडीने अटक केलेल्या राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांच्याकडील ८ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. मलिक यांच्याविरोधातील ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या होत्या.
कुटुंबियांच्या नावावरील मालमत्ताही जप्त
ईडीने गोवावाला कंपाउंड त्याचबरोबर वांद्रे आणि कुर्ला परिसरातील मालमत्ता जप्त केली आहे. यात जमिनी आणि फ्लॅट्स आहेत. मंगळवारी, १२ एप्रिल रोजी इकबाल कासकरचा ठाण्यातील फ्लॅट ईडीने जप्त केला होता, आता ईडीने दाऊद कनेक्शनमध्ये अटकेत असलेल्या नवाब मलिकांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. मलिकांची एकूण ८ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने असलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि ईडीने त्यांच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मागच्या महिनाभरात ईडीने वेगवेगळ्या कारवाया केल्या होत्या, ज्यामध्ये प्रताप सरनाईक आणि श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या.
(हेही वाचा मराठी शाळांची वाताहत, मदरशांवर मात्र खैरात, उद्धवा अजब तुझे सरकार!)
कोणत्या मालमत्ता केल्या जप्त?
- कुर्ल्यातील गोवा वाला कंपाउंड – येथील जमीन मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरकडून खरेदी केली होती, त्यातून त्यांचे दाऊद कनेक्शन समोर आले.
- वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जमीन
- उस्मानाबाद येथील १४७ एकर शेत जमीन
- कुर्ला पश्चिम येथील ३ फ्लॅट
- २ राहती घरे