सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शरद पवारांचे विश्वासू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. कुख्यात तस्कर आणि गँगस्टर इक्बाल मिर्ची आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वरळीतील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजल्यांचा समावेश आहे.
ईडीच्या या कारवाईनंतर प्रफुल्ल पटेल यांना आता वरळीतील सीज हाऊस इमारतीमधील चार मजले रिकामे करावे लागणार आहेत. दरम्यान याबाबत ईडीने सांगितले की, गेल्या वर्षी ही कारवाई करण्यात आली होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि न्यायनिर्णय प्राधिकरणाने त्याला दुजोरा दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी असलेल्या इक्बाल मिर्चीकडून प्रफुल्ल पटेल यांनी ही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेलांनी मिर्चीसोबत करार करून मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसमधील मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या मालमत्तेबाबत २००७मध्ये करार झाला असल्याचा दावा ईडीकडून केला होता. पण, प्रफुल्ल पटेलांनी वारंवार हे आरोप फेटाळले. मनी लाँड्रिंगशी संबंधित या प्रकरणात ईडी पीएमएलए अंतर्गत तपास करत असून न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा – प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केले पंतप्रधान मोदींचे खास जॅकेट, किंमत किती जाणून घ्या)
Join Our WhatsApp Community