नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंगळवारी ईडीकडून अब्दुल्ला यांच्याविरोधात कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पीएमएलए न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये मनी लॉड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अब्दुल्ला यांच्यासह अहसान अहमद मिर्झा,मीर मंजूर गझनफर आणि इतरांची नावे देखील या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. सर्व आरोपींना पीएमएलए विशेष न्यायालयात हजर राहण्याची नोटीस देखील बजावण्यात आली आहे. त्यानुसार सर्व आरोपींना 27 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
(हेही वाचाः खंजीर, खंजीर करता…देव करो तुम्हाला बोधचिन्ह खंजीरच मिळो! मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला)
काय आहे प्रकरण?
2001 ते 2012 या काळात जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद फारुख अब्दुल्ला यांच्याकडे होते. त्यावेळी 2004 ते 2009 मध्ये या असोसिएशनमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत सीबीआय आणि ईडीद्वारे चौकशी करण्यात आली होती. 21 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने यापूर्वीच जप्त केली होती. यामध्ये अब्दुल्ला यांच्या 11.86 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
याच प्रकरणात अनेकदा अब्दुल्ला यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. 31 मे 2022 रोजी अब्दुल्ला यांची तीन तासांहून अधिक काळ ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community