परमबीर सिंग यांनी वसुलीचे आरोप केल्यानंतर अडचणीत आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता मोठा धक्का बसला आहे. ईडीने त्यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर ही कारवाई करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
ईडीची कारवाई
परमबीर सिंग यांनी केलेल्या वसुलीच्या गंभीर आरोपांची दखल घेत, उच्च न्यायालयाने देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्याने ईडीकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती. त्यानुसार ईडीने देशमुखांच्या निवासस्थानी अनेकदा धाड टाकली. त्यानुसार आता पीएमएल अंतर्गत अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
ED has attached immovable assets worth ₹4.20 Crore belonging to Anil Deshmukh and his family under PMLA in a corruption case.
— ED (@dir_ed) July 16, 2021
(हेही वाचाः अनिल देशमुखांचा वसुलीमध्ये थेट सहभाग! संजीव पालांडे यांची कबुली )
परमबीर सिंग यांनी केले होते आरोप
अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री असताना, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत, संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा लेटर बॉम्ब फोडला होता. या पत्रात त्यांनी थेट राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतील बार आणि हॉटेल्सकडून 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता.
(हेही वाचाः ‘नंबर १ साहेब’ देशमुख नसून परमबीर सिंग! अनिल देशमुखांच्या वकिलाचा दावा)
वाझेने दिली होती कबुली
बार मालकांकडून वसूल केलेले 4 कोटी 70 लाख रुपये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले, अशी कबुली सचिन वाझे याने चौकशीत दिली होती. ईडीने वाझेची तळोजा कारागृहात जाऊन चौकशी केली, तेव्हा त्याने ही माहिती दिली. ईडीने 100 कोटींपैकी 60 कोटींच्या व्यवहारांची आतापर्यंत माहिती मिळवली आहे. बार मालक जया पुजारी आणि महेश शेट्टी या दोघांनीही गुड लक मनी म्हणून, डिसेंबर महिन्यात 40 लाख रुपये वाझेला दिले होते, जे देशमुखांना गेले, असेही वाझेने ईडीच्या चौकशीत मान्य केले. काही पैसे हे वाझे सीआययुमध्ये करत असलेल्या हाय प्रोफायईल प्रकरणांच्या तपासादरम्यान जमवण्यात आल्याचाही ईडीला संशय आहे.
(हेही वाचाः बार मालकांकडून वसूल केलेले ४.७० कोटी अनिल देशमुखांना दिले! वाझेची कबुली)
अशी आहे संपत्ती
मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांनी दागिन्यांमध्ये 29 लाख 26 हजार, एलआयसीमध्ये 2 लाख 97 हजार, तसेच बाँड, शेअर्समध्ये 3 लाख 86 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. 2019 मध्ये नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना, देशमुख यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती सादर केली होती. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण 14 कोटी 6 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यात 12.9 कोटी रुपयांच्या चल आणि 1.7 कोटी रुपयांच्या अचल संपत्तीचा समावेश आहे. देशमुख यांच्याकडे 1 कोटी 19 लाख रुपयांची शेतजमीन, तर 4 कोटी 15 लाखांची बिगर शेतजमीन आहे. त्यांच्या नावावर नवी मुंबई आणि वरळी येथे दोन फ्लॅट आहेत. त्यापैकी एका फ्लॅटची किंमत 2 कोटी 23 लाख असून, दुस-या फ्लॅटची किंमत 5 कोटी 27 लाख असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः देशमुखांवरचा ‘तो’ आरोप आणि त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम कसा आहे? वाचा…)
Join Our WhatsApp Community