अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी), गुरुवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ए.बी.माने यांच्यासह मुख्यालयातील 5 जणांना ताब्यात घेतले. या पाचही जणांना पोलिस बंदोबस्तात मुंबईला आणण्यात आले आहे. यावेळी कारवाईदरम्यान कर्मचारी संघटनेने विरोध केल्यामुळे कमालीचा तणाव निर्माण झाला होता.
( हेही वाचा : मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम )
ईडीचे पथक बुधवारपासून बँकेची तपासणी करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या काळात बँकेने काही साखर कारखान्यांना चुकीच्या पध्दतीने कर्ज वाटप केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. ईडीच्या 18 अधिकाऱ्यांच्या पथकाने बँकेत तपासणी करून या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी ईडीने मुख्य कार्यालसह बँकेच्या इतर काही शाखांचीही झाडाझडती घेतली. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांच्यासह वरिष्ठ व्यवस्थापक आर.जे.पाटील यांच्यासह अन्य तिघांना समन्स बजावून ताब्यात घेण्यात आले. साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करणारा विभाग, बिगर कर्ज या शाखेचे हे अधिकारी आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी एकत्र झाले. त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली व अधिकाऱ्यांना बाहेर नेण्यास विरोध केला. परंतु पोलिसांच्या बंदोबस्तात या अधिकाऱ्यांना मुंबईला हलवण्यात आले.
Join Our WhatsApp Community