भावना गवळी यांना ईडीकडून दुस-यांदा बोलावणे!

ईडी या प्रकरणी १८ कोटी रुपयांचा अपहार व सात कोटी रुपयांची चोरी याचा माग घेत आहे.

114
शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा समन्स पाठवून २० ऑक्टोबरला चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी गवळी यांना ईडीने ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले होते. त्या वेळी त्यांनी १४ दिवसांचा कालावधी मागितला होता.

६९ कोटी रुपयांची मालमत्ता कंपनीत हस्तांतरित 

गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने अटक केली होती. ट्रस्टला कंपनीत रूपांतर केल्याप्रकरणी ईडी गवळी यांची चौकशी करणार आहे. ईडीने याप्रकरणी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, गवळी यांनी सईद खान व इतर साथीदारांच्या मदतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या ट्रस्टचे कंपनी कायदा कलम ८ च्या अंतर्गत कंपनीत रूपांतरित केले. त्यात खोट्या कागदपत्रांचा वापर झाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीच्या तपासानुसार याप्रकरणात बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाला. त्या माध्यमातून ट्रस्टमधील ६९ कोटी रुपयांची मालमत्ता कंपनीत हस्तांतरित करण्यात आली.

१८ कोटी रुपयांचा अपहार 

३ जानेवारी २०२० मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आली. त्यातील एक संचालक सईद खान होता. याप्रकरणी ईडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे ऑडिटर उपेंद्र मुळ्ये यांचाही जबाब नोंदवला आहे. त्यात ट्रस्टमधून सात कोटी रुपये काढण्यात आल्याचेही म्हटले आहे. सईद यांच्या अटकेपूर्वी ईडीने याप्रकरणी रिसोड येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, रिसोड येथील अर्बन कॉ. क्रेडिट सोसायटी, सीए हकीम शेख यांचे कार्यालय, नागपूर येथील सीएस मोहम्मद अथर यांचे कार्यालय, औरंगाबाद येथील उपेंद्र मुळ्ये यांचे घर, परभणी येथील सईद खानचे घर येथे शोधमोहीम राबवली होती. त्यावेळी महत्त्वपूर्ण कागदपत्र ईडीच्या हाती लागली होती. ईडी याप्रकरणी १८ कोटी रुपयांचा अपहार व सात कोटी रुपयांची चोरी याचा माग घेत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.