अनिल देशमुखांच्या ‘कोठडी’साठी मुलाची ‘चौकशी’?

न्यायालयाने अनिल देखमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कोठडीचा १ दिवस बाकी आहे.

110

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. ईडीने त्यांना अटक केल्याने देशमुख यांची दिवाळी बंदिस्त ईडीच्या कोठडीत जात आहे. त्यात आता ईडीने देशमुखांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. शुक्रवारी, ५ नोव्हेंबर रोजी त्याला सकाळची ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

देशमुखांच्या कोठडीचा १ दिवस बाकी 

अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर जेव्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कोठडीचा १ दिवस बाकी आहे. त्या आधीच ईडीने आता देशमुखांच्या मुलाला चौकशीसाठी बोलावले आहे. कदाचित ईडी अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा या दोघांची समोरासमोर चौकशी करेल अन्यथा स्वतंत्र करून उत्तरे पडताळून घेईल. उद्या देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशा वेळी जर ईडीने कोठडी मागितली तर तसे ठोस पुरावे सादर करावे लागणार आहेत, ते पुरावे जमा करण्यासाठी  ऋषिकेश देशमुखची चौकशी होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : केंद्राने केले आता राज्याने ‘करून दाखवावे’!)

काय संबंध आहे ऋषिकेशचा? 

देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाकडे माजी पोलिस आयुक्तर परमबीर सिंह यांनी  नुकतेच प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये त्यांनी चक्क देशमुखांच्या आरोपाबाबत पुरावे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ईडीला आता देशमुखांच्या विरोधात भक्कम पुरावे जमा करावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांच्या मुलाकडे ईडीने लक्ष केंद्रित केले आहे. सचिन वाझे याने त्याच्या पत्रात बार मालकांकडून ४.७ कोटी रुपये घेऊन ते देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिले, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे. यामध्ये ऋषिकेश देशमुख हा जैन बंधूंच्या संपर्कात होता, असा आरोप आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.