जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर याच प्रकरणी ईडीने सखोल चौकशी सुरु केल्यावर यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे सातारा जिल्हा सहकारी बँकेपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे ईडीने या बँकेला नोटीस पाठवली असल्याची माहिती आहे. या बँकेने या कारखान्याला तब्बल ९६ कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. याशिवाय पुणे जिल्हा बँकेसह आणखी चार बँकांनी या कारखान्याला कर्ज दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या सर्व बँकांच्या संचालक मंडळांचे धाबे दणाणले आहेत.
अजित पवारांसमोर संकट वाढले!
आघाडी सरकारच्या काळात अजित पवार हे शिखर बँकेचे अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी को ऑप बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात या बँकेत कथित २५ हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. जरंडेश्वर कारखाना अवसायनात निघाला, तेव्हा तो कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप झाला आहे. विशेष म्हणजे या कारखान्याला अजित पवारांच्या कारकिर्दीतच ४ सहकारी बँकांनी कर्ज दिले आहे. ज्यामध्ये सातारा जिल्हा बँकेचा सामावेश आहे. हा कारखाना अजित पवारांचे मामा राजेंद्र घाडगे यांचा आहे. ते या बँकेचे चेअरमन आहेत. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २२ ऑगस्ट २०१९ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा : कोकणात कोरोनाचा रेड अलर्ट, तरी गणपतीला जाण्यासाठी गाड्या फुल्ल!)
कारखाना विकला अवघ्या ४० कोटीत!
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव इथे आहे. या कारखान्याची जमीन तब्बल २१४ एकर इतकी आहे. केवळ जमीनच नाही तर कारखान्याची टोलेजंग इमारत आहे. जर कारखाना आहे म्हटल्यावर त्यात मशिनरी असणारच, शिवाय कारखान्याची वाहने-गाड्या, संचालकांचे बंगले, अशी सर्व मालमत्ता केवळ ४० कोटी रुपयांना लिलावात विकली आहे.
Join Our WhatsApp Community