जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना ईडीने बजावले समन्स!

खडसे यांना गुरुवारी, ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

पुण्यातील एमआयडीसी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आल्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांना गुरुवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. मात्र गुरुवारी एकनाथ खडसे हजर राहण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. दरम्यान गिरीश चौधरी यांना १२ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील एमआयडीसी येथील जमीन व्यवहार प्रकरणात ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.

जमिनीच्या खरेदी व्यवहारात अफरातफर केल्याचा आरोप!

बुधवारी त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील जमीन व्यवहार प्रकरणात २०१७ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी आणि जमिनीचा मूळ मालक अब्बास अकानीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एमआयडीसीमधील मोक्याच्या जागेवर असलेल्या जमिनीच्या खरेदी व्यवहारात अफरातफर केल्याचा आरोप खडसेंवर ठेवण्यात आला होता.

(हेही वाचा : एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीकडून अटक)

गुरुवारी खडसे ईडीच्या कार्यालयात हजर राहणार का?

दरम्यान या प्रकरणात ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. एकनाथ खडसे यांना देखील या प्रकरणात ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. दरम्यान मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौधरी यांनी सोबत आणलेले कागदपत्रे ईडीकडे सोपवले होते, या कागदपत्रांच्या तपासानंतर ईडीने गिरीश चौधरी यांना अटक केली. दरम्यान बुधवारी ईडीकडून एकनाथ खडसे यांच्या समन्स बजावण्यात आले आहे, खडसे यांना गुरुवारी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. मात्र गुरुवारी सकाळी एकनाथ खडसे हे ईडीच्या कार्यालयात हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here