राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमागे लागलेली ईडीची पीडा आता वाढता वाढता वाढे जात असल्याचे दिसत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ पिता-पुत्रांना ईडीकडून हे समन्स बजावण्यात आल्याचे समजत आहे. 10 सप्टेंबर रोजी ईडीकडून अडसूळ पिता-पुत्र तसेच अडसूळांचे जावई यांच्या घरी व कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या होत्या.
रवी राणांनी केली होती तक्रार
फेब्रुवारी महिन्यात अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या 91 हजार खातेदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी अडसूळ यांच्यावर केला होता. 900 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यासंदर्भात अडसूळ व त्यांचे पीए सुनील भालेराव यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली होती. या दोघांच्या नावावर असलेली बेनामी संपत्ती जप्त करुन ईडी व सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही या तक्रारीतून करण्यात आली होती.
बँकेच्या पैशांचा गैरवापर
सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची खाती आहेत. तत्कालीन बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बँकेत जमा झालेला पैसा मोठ्या कंपन्या, बिल्डर यांना कर्ज स्वरूपात दिले होते. एवढेच नाही तर बँकेच्या पैशाचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी घेण्यासाठी केला, असा आरोप रवी राणा यांनी केला.
मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने 10 सप्टेंबर रोजी आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा अभिजीत व जावई यांची घरे व कार्यालयांची झाडाझडती घेतली होती. या धाडीदरम्यान आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्याची माहिती आहे.
मी घाबरणार नाही
न्यायालयात माझ्या प्रकरणावर नवनीत राणा यांच्याविरुद्ध बनावट जात प्रमाणपत्र विषयी असलेली याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आली असताना त्यादिवशीही जाणीवपूर्वक ईडीचे अधिकारी माझ्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. केंद्राकडून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दाम्पत्यांच्या प्रेमापोटी वापरण्यात येणाऱ्या दबावतंत्राला मी घाबरणार नाही. आमदार राणाद्वारे कथितरित्या पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांना बळी पडू नये आणि माध्यमांनीही जनतेसमोर वस्तुस्थिती ठेवावी, अशी प्रतिक्रिया त्यावेळी अडसूळांनी दिली होती.
Join Our WhatsApp Community