ईडीने न्यायालयात सांगितला वाझे-देशमुखांचा १०० कोटी वसुलीचा मार्ग !

वसुलीच्या कामाचे विभाजन शिस्तबद्धपणे करण्यात आले. मुंबई पोलिस दलातील जेवढे झोन आहेत त्यानुसार एक वेगळी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती. त्या यंत्रणेमार्फत पैसे गोळा केले जात होते, असे ईडीच्या वकिलाने सांगितले. 

133

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी वसुलीप्रकरणाचा तपास ईडीकडून सुरु आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करत असताना देशमुखांचे दोन स्वीय साहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. त्यांचा ईडीला रिमांड मिळावा यासाठी ईडीच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी ईडीने बार मालकांकडून सचिन वाझे कसा पैसे जमा करायचा आणि तो कुंदन, पालांडे यांच्या माध्यमातून अनिल देशमुख यांच्यापर्यंत कसा पोहचण्याचा ही चेनच ईडीच्या न्यायालयात सांगितली. त्यावरती न्यायालयाने पालांडे आणि कुंदन या दोघांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.

वसुलीची वेगळी यंत्रणा होती!

या सुनावणीदरम्यान ईडीच्या वकिलांनी मोठमोठे दावे केले. सचिन वाझे याने बार, पब आणि ऑर्केस्ट्रामधून वसूल केलेले कोट्यवधी रुपये अनिल देशमुखांना दिले, असा दावा ईडीचे वकील सुनिल गोन्सालवीस यांनी केला. याशिवाय देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांमधूनही पैसे उकळले असाही दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे. वसुलीच्या कामाचे विभाजन हे देखील शिस्तबद्धपणे करण्यात आले. मुंबई पोलिस दलातील जेवढे झोन आहेत त्यानुसार एक वेगळी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती. त्या यंत्रणेमार्फत पैसे गोळा केले जात होते. हे सगळे पैसे वाझेमार्फत कुंदन शिंदे यांच्यापर्यंत जायचे. तसेच पालांडे हे संपूर्ण व्यवहाराबाबत चर्चा करायचे. पैसे कुठून यायचे आणि कुठे जायचे याबाबतचा सविस्तर कागदपत्रांसह ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

(हेही वाचा : १० बार मालकांनी अनिल देशमुखांना दिले ४ कोटी?)

वसुलीची दिली कबुली!

देशमुखांचे स्विय सहाय्यक पालांडे आणि कुंदन यांनी पोलिसांची बदली आणि बार मालकांकडून हप्ता वसुलीच्या माध्यामातून कोट्यवधी रुपये उकळले. ज्या बार मालकांकडून पैसे उकळले त्यांचे जबाब नोंदवले, त्यांनी हे पैसे सचिन वाझेला दिले. सचिन वाझेचाही तुरुंगात जबाब नोंदवला आहे. त्याने गुन्ह्याची कबूली देत हे पैसे कुंदन यांना दिल्याचे सांगितले. वाझेने झोन १ ते ७ मधून जानेवारी व फेब्रुवारी दरम्यान १ कोटी ६४ लाख जमा करून घेतले. तर वाझेने झोन ८ ते १२ मधून २ कोटी ६६ लाख जानेवारी फेब्रुवारी दरम्यान घेऊन दिले. हे पैसे बार राञी १२ नंतर सुरू ठेवण्यासाठी व आर्केस्ट्रा बारमध्ये नियमापेक्षा जास्त  नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी मिळावी म्हणून देण्यात आले, असे ईडीच्या वकिलाने ईडीच्या न्यायालयात युक्तीवाद करताना सांगितले.

पालांडे यांनी बदल्यांसंदर्भात पैसे जमा केले!  

देशमुख  आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे नागपूरात साई संस्था ट्रस्ट नावाची संस्था आहे. कुंदन हे देखील त्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहेत. तसेच दिल्लीसह इतर ठिकाणच्या कंपन्यांमध्ये ते मोठ्या पदावर आहेत. या प्रकरणात सीबीआय भ्रष्टाचाराचा तपास करत आहे. तर ईडी पैशांचा व्यवहार कसा झाला? कुठे पैसे गुंतवण्यात आले?, याचा तपास करत आहे. हे एक-दोघाचे काम नाही. यात अन्य आरोपींचा सहभाग असल्याने या दोघांची ७ दिवस कोठडी मिळावी, अशी मागणी ईडीने केली. न्यायालयाने पालांडे आणि शिंदे या दोघांना १ जुलैपार्यंत ईडी कोठडी सुनावली.

(हेही वाचा : अनिल देशमुखांचा ईडी कार्यालयात येण्यास नकार! ‘हे’ दिले कारण!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.