संजय राऊतांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय, नितेश राणेंचं टीकास्त्र

86

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. मुंबईतील पत्राचाळ घोटाळाप्रकरणात संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले, आमच्या सगळ्यांची सकाळ खराब करणारे आज त्यांची सकाळ खराब होत असताना समाधान वाटते. ईडी, सीबीआय, एनएआय या तपासयंत्रणा योग्य दिशेने चौकशी करतात, असे नितेश राणे म्हणाले.

( हेही वाचा : राऊतांच्या अडचणी वाढल्या; किरीट सोमय्या म्हणतात, “हिसाब तो देना पडेगा” )

त्यांची अवस्था पाहण्यासाठी कॅमेरा लावायला हवा

या महाशयांना वारंवार चौकशीसाठी बोलावलं गेलं पण स्वत: कोणीतरी मोठं आहे असं दाखवायच, आता जेव्हा ईडी चौकशी करत असेल तेव्हा त्यांची आत काय अवस्था होत असेल हे पाहण्यासाठी कॅमेरा लावायला हवा असेही नितेश राणे म्हणाले. दरम्यान, ईडीचे अधिकारी रविवारी पहाटे संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले आहेत. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते आणि त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती, यानंतर आता ईडीचे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच संदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले होते.

ईडीने आधीच जप्त केलेत ९ फ्लॅट याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. ही संपत्ती ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’चे माजी निर्देशक प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर, सफाळे, पडघा येथील जमिनींबरोबरच दादरमधील वर्षा राऊत (संजय राऊत यांच्या पत्नी) यांचा फ्लॅट आणि अलिबामधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर (सुजित पाटकर यांच्या पत्नी) या दोघींची एकत्रित मालकी असणाऱ्या जमिनीचा समावेश आहे. अलिबागमध्ये भूखंड खरेदी केलेल्या भूखंडांची किंमत साधारणतः ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.