साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आज सकाळी ६ वाजल्यापासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफांच्या कोल्हापूर आणि पुण्यात दोन ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे मुश्रीफांचा काऊंटडाऊन सुरू झाल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी दिली होती. पण या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित कारखान्याशी आणि चंद्रकांत गायकवाड यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचं सांगून सफाई दिली आहे. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खोटे आहेत, शेतकऱ्यांच्या पैशांतूनच कारखान्यांची उभारणी झाल्याचं, हसन मुश्रीफ म्हणाले. पण आता याप्रकरणात ईडीच्या छापेमारीमधून कोणते नवे खुलासे होतायत? आणि राष्ट्रवादीच्या नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर लागतोय का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीचं १०० कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळाला. तसेच कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक अटकेत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ईडीच्या रडावर आले आहेत. आज सकाळपासून मुश्रीफांसंबंधित असलेल्या कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख कोणत्या प्रकरणात ईडीच्या रडारवर आले होते हे जाणून घ्या.
नवाब मलिकांचं नेमकं प्रकरण काय?
महाविकास आघाडीचे सरकार असताना नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याचा खुलासा झाला होता. हसीन पारकरकडून कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदी कवडीमोल भावात केल्याचा आरोप मलिकांवर ई़डीकडून करण्यात आला होता. या व्यवहारात मलिकांनी आर्थिक गैरव्यवहार केला होता. तसेच मलिकांकडून हसीन पारकरने स्वीकारलेले पैसे टेरर फंडिंगसाठी दाऊदने वापरल्याचे, ईडीने सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ नवाब मलिकांना अटक केली असून अजूनही ते तुरुंगवासात आहेत.
अनिल देशमुखांचं नेमकं प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांवर १०० कोटींची खंडणी वसूल केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल करुन चौकशी सुरू केली. मग याप्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक सचिन संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली. त्यानंतर देशमुखांना याप्रकरणातील प्रमुख आरोपी म्हटले आणि त्यांची ४ कोटींची संपत्ती जप्त केली होती. दरम्यान अनिल देशमुख यांची सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. तसेच ईडीने बार मालकांकडून गोळा करण्यात आलेला पैसा दिल्लीहून नागपूरला देशमुख यांच्या ट्रस्टमध्ये जमा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी देशमुखांच्या मुलालाही ईडीने समन्स बजावला होता.
ईडीने मनी लाँड्रिग प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याला सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुखांनी आव्हान दिलं होतं. माझ्याविरोधात कोणतीही अटकेची कारवाई करू नये, अशी मागणी देशमुखांनी याचिकेद्वारे केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्यांची तुरुंगात रवानगी झाली होती. याप्रकरणी १ वर्ष १ महिना आणि २७ दिवसांच्या कारावासानंतर देशमुखांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. पण आता राष्ट्रवादीच्या तिसऱ्या म्हणजे हसन मुश्रीफ यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
(हेही वाचा – मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी )
Join Our WhatsApp Community