२०१९ नंतर अचानक शिवसेनेच्या सर्वात अग्रस्थानी पोहचलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी सेनेला भाजपपासून कायमचे तोडले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशावरून भाजपला बाजूला सारून दोन्ही काँग्रेससोबत सरकार स्थापनेची यशस्वी प्रक्रिया राऊतांच्या आग्रहाने पूर्ण झाली. याचे परिणाम अडीच वर्षाने जेव्हा राऊत यांना भोगावे लागत आहेत, तेव्हा त्यांच्या बाजूने बोलणारे केवळ शरद पवार दिसत आहेत, खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही अजून राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर बोलले नाहीत. शिवसेनेत एकाकी पडलेल्या राऊत यांच्या पाठिशी उभे असल्याचे शरद पवार दाखवत तरी आहेत. त्यामुळे राऊत नक्की कोणाचे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिल्लीत ठाण मांडले
५ एप्रिल रोजी ईडीने राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीन जप्त केली. तेव्हापासून २ दिवस राऊत मुंबईत फिरकलेच नाहीत. दिल्लीत ठाण मांडून बसलेले राऊत वैफल्यग्रस्त अवस्थेत दिसत आहेत. एरव्ही शिवसेनेचा प्रमुख नेता म्हणून मागेपुढे सेनेच्या खासदारांची फौज सोबत घेवून दिल्लीत वावरणारे राऊत यांच्यासोबत यावेळी एकही सेनेचा खासदार दिसला नाही.
शरद पवारांची औपचारिकता
राऊत यांनी दोन दिवस डॅमेज कंट्रोल करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण सगळे प्रयत्न विफल होत असल्याचे दिसल्यावर राऊत शेवटी पवारांच्या भेटीला गेले. त्यांचे फोटो सगळीकडे झळकले. दुसऱ्या दिवशी पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले, सर्वांना वाटले की ही भेट केवळ राऊत यांच्यासाठीच होती, प्रत्यक्षात मात्र भेटीनंतर पवार यांनी जेव्हा याचा खुलासा केला तेव्हा त्यांनी ‘आपण केवळ पंतप्रधान मोदी यांना राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईची माहिती दिली, मोदी यांच्याकडून यावर कोणत्याही प्रतिक्रियेची अपेक्षा बाळगली नाही’, असे सांगून ही भेट लक्षद्वीप येथील विविध समस्यांसाठी घेण्यात आली होती, असे सांगितले. यावरून पवार यांनीही राऊत यांना आधार देण्याचे सोपस्कार आटोपल्याचे ध्वनित झाले. पवारांच्या इतक्याशा प्रयत्नावरही राऊत यांनी पवारांचे जाहीर आभार मानले. मात्र यात कुठीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक ओळीची प्रतिक्रिया आली नाही.
महाराष्ट्रात केवळ भावाकडून निषेध
पक्षासाठी रोज भाजपला अंगावर घेणारे राऊत अडचणीत आले, तेव्हा या कठीण काळात मला शरद पवारांचाच आधार आहे, असे अप्रत्यक्षपणे सूचित करण्याची वेळ राऊतांवर आली आहे. इकडे महाराष्ट्रातही काही वेगळे चित्र पहायला मिळाले नाही. कारवाईनंतर केवळ राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केलेले निषेध आंदोलन या पलीकडे सेनेच्या एकाही आमदाराने निषेधासाठी रस्त्यावर उतरण्याची तसदी घेतली नाही. राऊतांच्या कारवाईवर ज्याप्रमाणात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटल्या ते पाहता राऊत नेमके कुणाचे सेनेचे की राष्ट्रवादी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
Join Our WhatsApp Community