आता शिवसेनेच्या ‘अनिल’ना आली ईडीची नोटीस

नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर अनिल परब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अनिल परब चांगलेच रडारवर आले होते.

79

राज्यात शिवसेना आणि भाजपा वाद रंगलेला असताना आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत. त्याचे कारण म्हणजे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती मिळत आहे. खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे, संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर अनिल परब यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अनिल परब भाजपच्या चांगलेच रडारवर आले होते.

काय आहे संजय राऊतांचे ट्वीट?

शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता, परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू. जय महाराष्ट्र… असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

(हेही वाचाः परबांनू आता सांभाळून रवा…)

याआधी भाजपने केली मागणी

अनिल परब हे आधीपासूनच भाजपच्या रडारवर असून, भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये १०० कोटी वसुलीच्या आरोपावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब या दोघांची सीबीआय चौकशी करावी, असा ठराव संमत केला होता. तसेच ‘मातोश्री’पासून अवघ्या अर्ध्या किमी. अंतरावर असलेल्या गांधी नगर, वांद्रे स्थित इमारत क्र. ५७ व ५८ मधील म्हाडाच्या मोकळ्या जागेवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कब्जा करुन २००० स्क्वे.फी.चे बेकायदेशीर बांधकाम करुन त्यामध्ये त्यांचे कार्यालय सुरू आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जुलै महिन्यात केला होता.

(हेही वाचाः भाजपचे आता मिशन ‘परब’)

कोण आहेत अनिल परब?

परिवहन मंत्री अनिल परब गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय आहेत. शिवसेनेचे विभागप्रमुख ते परिवहन मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. अनिल परब यांच्या कामाची दखल घेऊन शिवसेनेने त्यांची तीन वेळी विधान परिषदेवर वर्णी लावली. 2004-2010, 2012-2018 आणि जुलै 2018मध्ये त्यांची विधान परिषदेवर फेरनिवड करण्यात आली होती. 2017मध्ये ते अधिक चर्चेत आले, 2017च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यामुळे दोन्ही पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढवल्या. त्यावेळी परब यांनी भाजपचा प्रत्येक हल्ला परतवून लावत महापालिका निवडणुकीसाठी संपूर्ण मुंबई पिंजून काढली होती. या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पालिकेतील भ्रष्टाचारावरुन घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी परब यांनी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर भाजपला सडेतोड उत्तर दिले होते. या निवडणुकीनंतर परब यांची पक्षातील प्रतिमा अधिकच उंचावली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.