अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींची ही चौकशी 21 जुलै रोजी होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी ईडीने सोनिया गांधींना 23 जून रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते, परंतु कोरोना आणि आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे काँग्रेस अध्यक्षांनी चौकशी काही आठवडे पुढे ढकलण्याची विनंती केली होती. सोनिया गांधींनी ईडीला पत्र लिहून कोरोना आणि फुफ्फुसाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे होईपर्यंत होणारी चौकशी काही काळ पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
(हेही वाचा – ‘Work from Home’ कर्मचाऱ्यांचा कायदेशीर हक्क! ‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय!)
दरम्यान, ईडीने सोनिया गांधी यांना 21 जुलै रोजी ईडी कार्यालयात हजर होण्याची नवी नोटीस बजावली आहे. तर या प्रकरणी ईडीने राहुल गांधी यांची दीर्घकाळ चौकशी केली असून पाच दिवस चाललेल्या या अनेक तासांच्या चौकशीदरम्यान मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) राहुल गांधी यांचे जबाब नोंदवण्यात आले.
राहुल गांधी यांना आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान ‘यंग इंडियन’ची स्थापना, ‘नॅशनल हेराल्ड’चे ऑपरेशन आणि काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला दिलेली कर्जे आणि निधी हस्तांतराशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.