भावना गवळींना ‘वर्षा’ वर ‘नो एन्ट्री’?

खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीचा समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे भावना गवळी यांना आता ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. मात्र त्याआधी भावना गवळी ह्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी, १ ऑक्टोबर रोजी वर्षा बंगल्यावर गेल्या होत्या. मात्र १ तास त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले. त्यानंतर मात्र त्या मुख्यमंत्र्यांना न भेटताच परत माघारी फिरल्या, त्यामुळे शिवसेनेकडून भावना गवळी यांना ‘वर्षा’वर ‘नो एन्ट्री’ आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली.

१०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप! 

खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते. वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीने येथून अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळी यांच्याशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या एका संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर सोमय्या यांनी गवळी यांच्यावर निशाणा साधला होता. इतके पैसे गवळी यांच्याकडे आले कुठून, असा सवाल त्यांनी केला होता. तसेच, चौकशीची मागणीही केली होती. तेव्हापासून गवळी ईडीच्या रडारवर असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा ईडीकडून केली जात आहे.

(हेही वाचा : शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली शहरांचा घोटला गळा!)

गवळींकडे शिवसेनेची पाठ!

या मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यानंतर आता ईडीने भावना गवळी यांनाही समन्स बजावला आहे. त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. त्याआधी गवळी यांनी थेट वर्षा निवासस्थान गाठले. मोठ्या आशेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या गवळी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र १ तासांची प्रतीक्षा करूनही भेट दिली नाही. त्यामुळे अखेर गवळी परत माघारी फिरल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here