आरटीओ अधिकाऱ्यानंतर ईडीकडून ‘या’ मंत्र्याची होणार चौकशी

आठ तासांच्या चौकशीनंतर खरमाटे हे रात्री ८ वाजता ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. ईडीने खरमाटे, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचे मोबाईल फोन तपासणीसाठी घेतले होते.

78

बदल्या आणि नियुक्तीत आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीने सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याकडे आठ तास कसून चौकशी केली. खरमाटे यांच्या चौकशीनंतर ईडीकडून अनिल परब यांची या संदर्भात चौकशी करणार आहे. परब यांना यापूर्वीच ईडीने समन्स बजावले होते, मात्र त्यांनी काही कारणास्तव ईडीकडे वेळ मागून घेतली आहे.

बदल्यांच्या गैरव्यवहाराबात तक्रार

राज्याच्या परिवहन विभागात बदल्या आणि नियुक्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असून, मोठ्या रक्कमा घेऊन मलईदार ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असल्याचा आरोप बजरंग खरमाटे यांच्यावर या विभागातीलच निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी केला होता. याप्रकरणी पाटील यांनी तक्रार अर्ज देखील मे महिन्यात दाखल केला होता. या अर्जात त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावाचा देखील उल्लेख केला होता.

(हेही वाचाः मंत्री अनिल परबांची पदोन्नती भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी! कुणी दिले आदेश?)

परबांना समन्स

या प्रकरणात ईडीने चौकशी सुरू करुन गेल्या आठवड्यात बजरंग खरमाटे यांच्या नागपूर आणि सांगली येथील घरी छापेमारी केली. यावेळी काही महत्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले होते. दुसऱ्याच दिवशी ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. मात्र परब यांनी ईडीला पत्र देऊन १४ दिवसांची मुदतवाढ मागून वेळ देण्यात यावा, असे कळवले होते.

(हेही वाचाः अनिल परबांना हवा १४ दिवसांचा वेळ)

आठ तास कसून चौकशी

दरम्यान ईडीने शनिवारी परिवहन विभागाचे उपायुक्त दर्जाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांना समन्स बजावून सोमवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खरमाटे हे ईडी कार्यालयात हजर झाले. आठ तासांच्या चौकशीनंतर खरमाटे हे रात्री ८ वाजता ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. ईडीने खरमाटे, त्यांची पत्नी आणि मुलगा यांचे मोबाईल फोन तपासणीसाठी घेतले होते. ते तपासण्यात आले असून, नागपूर आणि सांगली येथे सापडलेल्या काही कागदपत्रांबाबत खरमाटे यांच्याकडे ईडीने चौकशी केली असल्याचे समजते. दरम्यान येत्या आठवड्यात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना देखील ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

(हेही वाचाः परबांना आलेल्या नोटीसचा शिवसेना नेत्यांनी घेतला धसका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.