विधान परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार?

विधान परिषदेतील या ८ आमदारांची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपत असल्याने येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होणे अपेक्षित आहे.

विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघातील ८ आमदारांची मुदत येत्या १ जानेवारी २०२२ रोजी संपत असल्याने विधान परिषदेतील रिक्त जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ८ जागांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकंदरीत विधान परिषदेच्या रिक्त जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

हे दिग्गज आमदार निवृत्त होणार

येत्या १ जानेवारी २०२२ मध्ये विधान परिषदेतील ८ आमदार निवृत्त होत आहेत . त्यामध्ये रामदास कदम (शिवसेना) मुंबई, भाई जगताप (काँग्रेस) मुंबई, सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर , प्रशांत परिचारक अपक्ष) सोलापूर, अमरिश पटेल (भाजप) धुळे- नंदुरबार, गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) अकोला- बुलढाणा, गिरिशचंद्र व्यास (भाजप) नागपूर, अरूण जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर यांचा समावेश आहे.

(हेही वाचा : रामदास कदमांना पुन्हा आमदारकी मिळण्याची शक्यता कमी! कारण काय?)

निवडणुकांना विलंब

विधान परिषदेतील या ८ आमदारांची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपत असल्याने येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होणे अपेक्षित आहे. राज्यात असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांना राज्यपालांनी अजूनही मंजुरी दिली नसल्याने विधान परिषदेच्या रिक्त जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदार मतदानासाठी पात्र असल्यास संबंधित जिल्ह्यात निवडणुका होतात. जिल्ह्यातील पाच नगर परिषदेतील नगरसेवकांची मुदत संपलेली असल्याने निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जाते, परंतु तज्ज्ञांच्या मते याचा परिणाम विधान परिषद निवडणुकीवर होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here