काँग्रेस, राष्ट्रवादीसह राज्यातील आठ पक्षांना मंत्रालयाशेजारी नवीन कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्पासाठी या पक्षांच्या कार्यालयांची जागा २०१५ साली ताब्यात घेण्यात आली होती.
( हेही वाचा : भंडाऱ्यातील कोका अभयारण्यात आढळला T13 वाघाचा मृतदेह)
यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारिप बहुजन महासंघ, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), आरपीआय डेमोक्रेटिक आणि समाजवादी पार्टी आदी पक्षांचा समावेश आहे. आधी मंत्रालय परिसरात या राजकीय पक्षांची कार्यालये होती. मात्र, मेट्रो ३ प्रकल्पासाठी तेथील जागा २०१५ साली ताब्यात घेण्यात आली. या पक्षांना बेलार्ड पिअर येथील ठाकरसी इमारतीत तात्पुरती पर्यायी जागा देण्यात आली असून, त्याचे भाडे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन भरत आहे.
राजकीय पक्षांसोबतच या परिसरातील २७ सरकारी कार्यालयांचेही स्थलांतर करण्यात आले होते. त्यांना दक्षिण मुंबईत पर्यायी जागा देण्यात आली होती. या सरकारी कार्यालयांनाही आता मंत्रालयाशेजारी नवी कार्यालये मिळणार आहेत. या कार्यालयांचे बांधकाम करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
किती जागा मिळणार?
नवीन बांधकामासाठी १ लाख १३ हजार ५०० चौ.फू. जागा उपलब्ध होणार आहे. संपादित जागेवर दोन उत्तुंग इमारती बांधल्या जाणार असून त्यापैकी एका इमारतीत पक्ष कार्यालयांना जागा मिळेल. तर दुसरी इमारत ही व्यवसायिक असेल. या इमारतीतील गाळे बाजारभावाने विकून कॉर्पोरेशनला महसूल मिळवता येईल. कार्यालयांचे स्थलांतर आणि पर्यायी भाडे यापोटी २०१६ सालापासून कॉर्पोरेशनला शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत.
Join Our WhatsApp Community