उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी परिसरात रविवारी झालेल्या हिंसाचाराबाबत आता उत्तर प्रदेश सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी रात्री शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वडरा यांना कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याचा दावा करत सीतापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पहाटे 4 वाजताच्या सुमारास हरगांव येथे अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हे नेते नजरकैदेत
यासोबतच बहुजन समाज पार्टीचे नेता सतीश चंद्र मिश्रा यांना लखनऊ निवास येथे नजरकैद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 4 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खिरी येथे जाण्याची घोषणा केली होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक करण्याची योजना आखली आहे. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
योगींनी दिले कारवाईचे आदेश
दरम्यान रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रात्री एक उच्चस्तरीय बैठक घेतलीय यावेळी उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी हिंसाचाराबाबत शोक व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.
गृहराज्यमंत्र्यांनी केला आरोप
या हिंसाचारात काही भाजपा कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर या गावात ही घटना घडली. शेतकरी आंदोलकांमध्ये लपलेल्या असामाजिक घटकांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर दगडफेक केली. त्यासोबतच लाठ्या-काठ्यांचा वापर करत त्यांना मारहाण करण्यात आलीव गाड्यांना आग लावली. याबाबतचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी सांगितले आहे. आमचे तीन कार्यकर्ते आणि एक ड्राईव्हर यात मारले गेले. त्यामुळे यात सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community