सत्यजित तांबे यांना राष्ट्रवादीने छुपा पाठिंबा दिल्याचे किस्से नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर चवीचवीने रंगवले गेले. बुधवारी सत्यजित तांबे आमदारकीची शपथ घ्यायला उभे राहिले असता, ‘एकच वादा…अजितदादा’, अशी घोषणाबाजी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उत आला आहे.
विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य विक्रम काळे, सुधाकर अडबाले, सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि धीरज लिंगाडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी सदस्यत्वाची शपथ दिली. विधान मंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार छगन भुजबळ, अशोक चव्हाण, जयंत पाटील, ॲड. आशिष शेलार, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन, तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधानपरिषद सदस्य निवडून आले आहेत. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान, सत्यजित तांबे आमदारकीची शपथ घेत असताना ‘एकच वादा…अजितदादा…’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सारेच आवाक झाले. यासंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, पुढील राजकीय निर्णय घेत असताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सल्ला मी सत्यजित तांबे यांना निवडून आल्यानंतर दिला होता. कदाचित तांबे यांना निवडून आणणारे कार्यकर्ते आणि मतदारांना माझा सल्ला आवडला असेल, त्यामुळे एखाद-दुसरी घोषणा माझ्या नावाने दिली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – काही लोक न्यायव्यवस्थेला सल्ले देताहेत – एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला)
काय म्हणाले अजित पवार?
नव्या निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचे मी अभिनंदन करीत असतो. आताही विधान परिषदेत निवडून आलेल्या पाचही जणांना अभिनंदनाचे, शुभेच्छांचे पत्र पाठविले आहे. भावी वाटचालींसाठी त्यांना सदिच्छा दिल्या आहेत. सत्यजित तांबे हे एक तरुण सहकारी निवडून आलेले आहेत. मी वडिलकीचा म्हणा अथवा एक सहकारी म्हणून सल्ला दिला. पुढचा निर्णय घेत असताना उद्याचे उज्ज्वल भवितव्य आणि पुढे असणारी सर्व आव्हाने लक्षात घेऊन राजकीय वाटचालीबाबत निर्णय घ्यावा, असा सल्ला मी सत्यजित यांना दिला होता, असे अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community