खडसेंना ईडीचे समन्स : प्रकृती खालावली, पत्रकार परिषदही केली रद्द!

ईडीने खडसेंच्या जावयांना अटक करून काही तास उलटत नाही तोच खडसेंना ईडीची नोटीस बजावण्यात आली. यानंतर खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली.

120

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केल्यानंतर ईडीने खडसे यांना गुरुवारी, ८ जुलै रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र बुधवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे गुरुवारी होणारी पत्रकार परिषदही रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या ट्विटर हॅण्डलवरून माहिती देण्यात आली. मात्र खडसे चौकशीला जाणार कि वेळ मागून घेणार, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा : जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना ईडीने बजावले समन्स!)

पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांची गुरुवारी पत्रकार परिषद होणार होती. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे त्यांची बाजू मांडतील, अशी शक्यता होती, मात्र त्याआधीच त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे.

जावयाच्या अटकेनंतर खडसेंना समन्स

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना मंगळवारी ६ जुलै रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली, त्याआधी त्यांची १३ तास कसून चौकशी करण्यात आली. अशा प्रकारे खडसेंच्या जावयांना अटक करून काही तास उलटत नाही तोच खडसेंना ईडीची  नोटीस बजावण्यात आली. यानंतर खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली. तसेच खडसेंना देखील अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.