मुख्यमंत्री बोलतात की धमकी देतात? – एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

131

मुख्यमंत्र्यांचे पहिले भाषण आम्ही अगदी आवडीने पाहिले, पण ते त्यांचे विषय मांडत असताना बोलतात की धमकी देतात हेच कळत नाही, आमच्याकडे तुमच्या कुंडल्या आहेत, बघतो तुला, अशी त्यांची भाषा. कुणीही कायमस्वरूपी सत्तेत नसतो, असे बोलण्यामुळे वातावरण दूषित होते, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.

( हेही वाचा : राज्यात १४ जिल्ह्यांत कौटुंबिक न्यायालये कायमस्वरूपी ठेवण्यास मान्यता – उपमुख्यमंत्री )

उद्धव ठाकरेंवर टीका

दीड वर्षांपूर्वी सामाजिक कामांना स्थगिती दिली होती. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिथे शिवसेनेचा आमदार नाही म्हणून आमच्या जिल्ह्यातील एका गावाच्या १४ कोटींच्या रस्त्याच्या बांधकामाला स्थगिती दिली होती, बजेटमध्ये तरतूद असतानाही स्थगिती देण्यात आली. आताचे सरकार ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती देत आहे, तशी त्यांनी दिलेली स्थगिती देखील उठवावी. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना ५० कोटी दिले जात असल्याची माहिती आहे. परंतु अन्य पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात तुमचे मतदार राहत नाहीत का, हा त्यांच्यावर अन्याय होत नाही का, असेही खडसे म्हणाले.

अधिकाऱ्यांना फोन करणार साहेब आहे तरी कोण?

रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर काय कारवाई केली, अशी विचारणा केली, तर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, लेखी उत्तर देवून कळवतो. या प्रकरणात गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. पोलिस कारवाई करत नाहीत. ३०७ चा गुन्हा दाखल आहे. महिलांच्या सुरक्षेच्या गप्पा मारता मग कारवाई का करत नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत म्हणून दुर्लक्ष करता का? गुंडांचे राज्य आहे का? पोलिसांना कुणी घाबरत नाही, एसपी आणि जिल्हाधिकारी यांनी विचारले तर वरून फोन आला, साहेबांचा फोन आला, अशी उत्तरे देत आहे, बदली होईल यामुळे घाबरून अधिकारी काही करत नाहीत. अधिकाऱ्यांना फोन करणार हा साहेब आहे तरी कोण, अशीही विचारणा खडसे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.